फोटो सौजन्य - सोशल मीडिया
पंढरपूर : राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा समाजानंतर आता धनगर समाज देखील त्यांच्या मागण्यासाठी आक्रमक झाला आहे. पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजाची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्य सरकारकडे धनगर समाजाच्या वतीने मागण्या काही करण्यात आल्या आहेत. या मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला आहे.
काय आहेत धनगर समाजाच्या मागण्या?
धनगर समाजाच्या शिक्षणाबाबत व आरक्षणाबाबत काही मागण्या आहेत. पंढरपूर येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने धनगर समाजातील तरुणांना तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळावे. याची अंमलबजावणी ही एकादशीच्या अगोदर याची करण्यात यावी. तसेच पंढरपुर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भवनासाठी जागा उपलब्ध करून पाच कोटी रुपये निधी मिळावा आणि अहिल्यादेवी घरकुल योजनेचे निकष बदलून तात्काळ ही योजना सुरू करावी. अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाला जाहीर केल्याप्रमाणे येणाऱ्या अधिवेशनात निधी जमा करण्यात यावा, अशी मागणी धनगर समाजाकडून करण्यात आली आहे.
तसेच वरील या सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर धनगर समाज रस्त्यावर उतरणार आहे. धनगर समाजाने त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यभर आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले. आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाहीत, तर अखंड धनगर समाजाचा रोष सरकारला सहन करावा लागेल, असे धनगर समाज पदाधिकारी माऊली हळणवर म्हणाले आहे. राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यानंतर आता धनगर समाज देखील त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आग्रही झाला आहे.






