गोंदिया : बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम तीन वर्षांपासून नियमित भरून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळाला आहे. अशा कर्जमुक्त शेतकऱ्यांना १ जुलैपासून ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यात तीन वर्षांपासून वेळेवर कर्ज भरून कर्जमुक्त झालेले सुमारे २९ हजार शेतकरी असून या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
खरीप आणि रब्बी पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ३१ मार्चपर्यंत शून्य टक्के दराने कर्ज घेतो, परंतु काही कारणास्तव शेतकरी कर्जाची रक्कम भरू शकत नाही. त्यामुळे त्यांना ३१ मार्चनंतर कर्जाची रक्कम व्याजासह भरावी लागते. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने दोन वर्षांपूर्वी कर्जफेड करून जे शेतकरी कर्जमुक्त होतील, त्यांना प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली होती, मात्र, ही घोषणा हवेत विरल्याचे चित्र होते. तर घोषणेवर कोणतीही अंमलबजावणी होत नव्हती.
अखेर, २०१७-१८, २०१८-१९, २०१९-२० या कालावधीत नियमित कर्ज भरणाऱ्या कर्जमुक्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. त्यासाठीची प्रक्रिया १ जुलैपासून सुरू होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील सुमारे २९ हजार शेतकरी आहेत, ज्यांनी वेळेवर कर्ज भरून कर्जमुक्तीच्या यादीत नाव नोंदवले आहे. या आदेशामुळे आता या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.