
Increase in Demand for Ice Due to Summer and Events Hingoli marathi News
Hingoli News : हिंगोली : जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस चढत असताना लग्नसराईच्या हंगामाने बर्फाच्या मागणीत अभूतपूर्व वाढ केली आहे. परिणामी, बर्फाचे दर अक्षरशः गगनाला भिडले असून बाजारपेठेत ‘बर्फ सोन्याच्या भावात’ विकला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील बर्फ कारखान्यांवर पहाटेपासूनच व्यापारी, केटरर्स आणि किरकोळ विक्रेत्यांची मोठी गर्दी उसळत आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे थंड पेये, सरबत, लस्सी, ज्यूस यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच लग्नसमारंभ, मुंज, वाढदिवस आणि विविध सामाजिक कार्यक्रमांमुळे बर्फाची गरज प्रचंड वाढली आहे. पाहुणचारात थंड पाण्यापासून ते आईस्क्रीम, शीतपेये आणि खाद्यपदार्थांच्या साठवणुकीसाठी बर्फ अत्यावश्यक बनला आहे.
मागणीच्या तुलनेत उत्पादन मर्यादित
त्यामुळे मागणी जवळपास दुपटीने वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या वाढत्या मागणीचा थेट परिणाम दरांवर झाला असून एका बर्फाच्या लादीसाठी १,००० ते १,२०० रुपये मोजावे लागत आहेत. काही ठिकाणी तर उपलब्धतेनुसार दर आणखी वाढत असल्याचेही समोर आले आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन मर्यादित असल्याने अनेक वेळा ग्राहकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. एमआयडीसी परिसरातील बर्फ कारखान्यांबाहेर सकाळपासूनच वाहनांच्या लांबलचक रांगा लागत आहे.
हे देखील वाचा : “मविआचा कार्यकर्ता वहिनींसोबत ताकदीनं उभा..; सुप्रिया सुळेंचे सांगता सभेत आश्वासन
तापमानवाढीने मागणीत आणखी उसळी
ग्रामीण भागातून आलेले लहान व्यावसायिक तर पहाटेपासूनच वर्फ मिळवण्यासाठी धावपळ करत असून, “बर्फ मिळवणे म्हणजे लढाई जिंकण्यासारखे झाले आहे, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली. दरम्यान, वाढत्या दरांमुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. लग्नसमारंभआयोजित करणाऱ्या कुटुंबांनाही अतिरिक्त खचांचा भार सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी बर्फाचा अपुरा पुरवठा टाळण्यासाठी पर्यायी उपाय शोधण्याचा प्रयत्न होत आहे. काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने बर्फाच्या मागणीत अजून वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हे देखील वाचा : अमृता फडणवीसांचा थायलंडमधील ‘वेस्टर्न’ लूक चर्चेत; मंदिर भेटीचे फोटो व्हायरल
व्यापाऱ्यांचा जामीन फेटाळला
हिंगोली शहरातील सराफा बाजारात झालेल्या मारहाण प्रकरणात चार सराफा व्यापाऱ्यांचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फेटाळला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. साईनाथ उदावंत व त्यांच्या मुलाच्या दुकानाच्या बांधकामावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून शुभम शहाणे, दिलीप शहाणे, वैभव शहाणे व देवेश शहाणे यांनी लोखंडी मुसळ व लाकडाने हल्ला करून उदावंत यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी २० मार्च रोजी गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघांना अटक केली होती. न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर करण्यात आला होता. फिर्यादींच्या वतीने अॅड. अविनाश बांगर व अॅड. हर्ष बनसोडे यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.