
13 रात्री आणि 14 दिवसांच्या या विशेष यात्रेची आखणी श्रावण महिन्याच्या पावन पर्वानिमित्त करण्यात आली असून श्रद्धा, अध्यात्म, सांस्कृतिक वारसा आणि आरामदायी प्रवासाचा अनोखा संगम या यात्रेत अनुभवता येणार आहे. या यात्रेदरम्यान भाविकांना द्वारकाधीश मंदिर (द्वारका), सोमनाथ ज्योतिर्लिंग (वेरावळ), महाकालेश्वर ज्योतिर्लिंग (उज्जैन), त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (नाशिक), घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग (छत्रपती संभाजीनगरजवळ) आणि मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (मार्कापूर) येथे दर्शन घेता येणार आहे.
याबाबत माहिती देताना श्री गौरव झा, समूह महाव्यवस्थापक, आयआरसीटीसी पश्चिम विभाग, यांनी सांगितले की या विशेष भारत गौरव पर्यटक रेल्वेमध्ये सुमारे 750 प्रवाशांची क्षमता असून प्रवाशांसाठी इकॉनॉमी स्लीपर (SL), स्टँडर्ड 3AC आणि कम्फर्ट 2AC अशा तीन श्रेणी उपलब्ध असतील. या यात्रेसाठी सोलापूर, कुर्डुवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, डहाणू रोड, वापी आणि सुरत या स्थानकांवरून चढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे मोठ्या संख्येने भाविकांना या यात्रेचा लाभ घेता येईल.
या सर्वसमावेशक पॅकेजमध्ये खालील सुविधा समाविष्ट आहेत:
एसी व नॉन-एसी डब्यांमधून आरामदायी रेल्वे प्रवास
बजेट हॉटेलमध्ये दुहेरी, तिहेरी किंवा चौघांच्या सामायिक निवासाची व्यवस्था
संपूर्ण प्रवासादरम्यान शुद्ध शाकाहारी भोजन
स्थानिक पर्यटन व दर्शनासाठी एसी/नॉन-एसी वाहनांची सुविधा
सर्वसमावेशक प्रवास विमा
प्रवासाच्या सुरळीत व्यवस्थापनासाठी अनुभवी आयआरसीटीसी टूर मॅनेजर्सची सेवा
प्रवाशांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य देत आयआरसीटीसीने सर्व आवश्यक उपाययोजना केल्या असून भाविकांना सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव मिळेल याची खात्री करण्यात आली आहे.
या यात्रेचे प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क पुढीलप्रमाणे आहे:
इकॉनॉमी स्लीपर (SL): ₹24,050
स्टँडर्ड 3AC: ₹39,730
कम्फर्ट 2AC: ₹52,400
या यात्रेसाठी नोंदणी ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर सुरू असून इच्छुक प्रवासी आयआरसीटीसीच्या पर्यटन पोर्टलवरून आपली नोंदणी करू शकतात. अधिक माहितीसाठी व आरक्षणासाठी प्रवाशांनी 8287931886 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा bgtmumbai@irctc.com या ई-मेलवर संपर्क साधावा.
डॉ. ए. के. सिंह, प्रवक्ते, आयआरसीटीसी पश्चिम विभाग, यांनी सांगितले की हा उपक्रम देशातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच भाविकांना सुरक्षित, परवडणारा आणि सुविधायुक्त प्रवासाचा अनुभव देईल. भारत गौरव पर्यटक रेल्वे उपक्रमाद्वारे देशाची समृद्ध धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आयआरसीटीसीचे प्रयत्न सुरू राहतील.