खालापूर : सध्या राज्यात काही ठिकाणी मुसळधार धो..धो पाऊस पडत आहे. चिपळूण, रायगड, रत्नागिरी, कोल्हापर, मुंबईसह पश्चिम उपनगर तसेच ठाणे, डोबिंवली, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर येथे मुसळधार पाऊस (Rain) पडत आहे. दरम्यान, रायगड, चिपळूण तसेच कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळं पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळं रायगडच्या खालापूरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalgad) (इरसालगड) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या येथे बचावकार्य व शोधकार्य जरी सुरु असले तरी, यात अनेक अडचणी येताहेत. गडावर पोहचण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
ही वाट अरुंद व चढाची…
खालापूर तालुक्यातील इरसाल वाडी ही सह्याद्री पर्वताच्या डोंगर कुशीत वसलेले एक छोटेसे गाव आहे.येथे आदिवासी समाजातील ठाकूर समाज वास्तव्य करीत आहे. साधारण ४० ते ५० घरांची वस्ती असलेल्या या गावात २०० ते २५० लोकांची वस्ती आहे. परंतु या गावातील काही लोकं खाली धरणात मासेमारी करण्यासाठी येत असल्याने त्यावेळी गावात नेमकी किती लोकं होती हे स्पष्ट होत नाही. या गावाकडे जाण्यासाठी चौक पासून पायी वाट आहे. या पायी वाटेने चालत जाण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागतो. ही वाट अरुंद व चढाची असल्यामुळे नवख्या माणसाला तिथे लवकर पोहोचणे शक्य होत नाही, तरीसुद्धा ही घटना घडल्याचे समजल्यानंतर स्थानिक सरपंच व तेथील काही त्यांचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी तेथे जाऊन परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्याची माहिती तहसील कार्यालय खालापूर व पोलीस यंत्रणेला दिली.
मदतकार्य सुरु…
ही माहिती मिळतात तहसीलदार आयुब तांबोळी व त्यांचे अन्य कर्मचारी वर्ग व पोलीस यंत्रणा तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास हे सर्व लोक त्या ठिकाणी पोचले मात्र त्या ठिकाणी असलेला अंधार व कोसळलेला दर्डीमधून वाहून येत असलेली माती आणि त्यातच पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बचाव कार्य करण्यास अडथळा निर्माण होत होता. मात्र प्रशासन व सामाजिक संघटना यांनी योग्य पद्धतीने नियोजन करून वरती लागणारी मदत वेळोवेळी फोनच्या माध्यमातून पायथ्याशी असलेल्या लोकांना कळवित झाल्यामुळे मदतीसाठी वरती जाणाऱ्यांना येथे मदतीसाठी आवश्यक असलेल्या वस्तू घेऊन पोहचणे शक्य होत होते. या काळात राज्याचे अनेक मंत्री दाखल झाले त्यांनी सुद्धा घटनेचा आढावा घेत घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न केला.
नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखाची मदत
सकाळी मुख्यमंत्री आल्यानंतर या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्याचे जाहीर करण्यात आले. तसेच जखमी झालेल्या व्यक्तींना दवाखान्याचा संपूर्ण खर्च हा महाराष्ट्र शासन करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री घटनास्थळी भेट देण्यासाठी जाणार असल्याने काही काळ मदत कार्यात अडथळा निर्माण झाला असला तरी मदत कार्यासाठी आलेल्या टीम व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आपले मदत कार्य सुरू ठेवले होते. या वाडीपर्यंत पायी चालत जाण्याव्यतिरिक्त अन्य कोणता मार्ग नसल्यामुळे या ठिकाणी मदत कार्यासाठी लागणारी साधनसामग्री पोचवण्यासाठी वेळ लागत आहे, हे जरी सत्य असले तरी सध्या सुरू असलेले बचाव कार्य पाहून लवकरच या अपघातात अडकलेल्या सर्व लोकांना बाहेर काढण्यात यश मिळेल असे दिसून येत आहे.