जव्हार : डिजिटल इंडियाच्या धूम धाम ला बगल देत, जव्हारमधील अंबिका नवरात्रौत्सव मित्र मंडळाने पारंपारिक संस्कृती जतन करीत, बुधवारी रात्री ९ वाजता ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन आयोजित करून एक सामाजिक सलोखा जपत नवा पायंडा घातला आहे. या वेळी सात हजार महिला व पुरुषांनी लाभ घेतला.
कोणत्याही सार्वजनिक मंडळात उत्सव साजरा करताना, सध्या नाच गाण्यापासून ते लावणी नाचपर्यंत कार्यक्रम ठेवण्याचा ट्रेंड झाला होता, परंतु या मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन विनीत मुकणे यांनी श्रद्धा व भक्तीचा अनोखा मेळ साधत कीर्तनाचे नियोजन केल्याने, महिलांनी विशेष कौतुक केले असून, आम्ही सर्व परिवार एकत्र येऊन हे भजन, कीर्तन ऐकले, खूप समाधान वाटले असे अनेक कुटुंबांनी सांगितले.
ह.भ.प. चैतन्य महाराज वाडेकर यांचे सुश्राव्य किर्तन, उत्तम गायन वृंद, नादब्रह्म मृदुंग आणि तबलावादन, तत्पूर्वी जमलेल्या वारकऱ्यांच्या सहवासातील त्यानिमित्ताने मिळालेला हरिपाठाचा आनंद अनुभवत अतिशय भक्तीमय वातावरणात सुंदर किर्तन सेवा झाली. यात तरूणाईचा प्रतिसाद उत्तम होता. या वेळी पालघरचे खासदार राजेंद्र गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम उपस्थित होते, तर जव्हार पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस निरीक्षक संजय ब्राह्मणे यांनी उत्तम पोलीस बंदोबस्त ठेवला होता तर नवरात्रौत्सव समितीने चांगले नियोजन ठेवले होते.