(Photo - X)
मुंबई : महाराष्ट्राच्या लॉजिस्टिक्स आणि सागरी क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. जेएनपीटी (Jawaharlal Nehru Port) हे 2030 पर्यंत दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले देशातील पहिले बंदर ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी व्यक्त केला आहे. पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिका कार्यान्वित झाल्यामुळे जेएनपीटीच्या माध्यमातून होणाऱ्या मालवाहतुकीला आणखी मोठी गती मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत जेएनपीटीने सुमारे 38.27 लाख TEU कंटेनर हाताळले आहेत. समर्पित मालवाहतूक मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर या वाहतुकीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
दादरी, उत्तर प्रदेश ते जेएनपीटी या पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेतील जेएनपीटी ते न्यू उमरगाव हा महत्त्वाचा भाग कार्यान्वित होत आहे. सुमारे 1,500 किलोमीटर लांबीची ही मार्गिका उत्तर भारताला पश्चिम भारताशी जोडणार आहे. त्यामुळे जेएनपीटीसारख्या महत्त्वाच्या बंदराच्या लॉजिस्टिक्स सुविधांचा लाभ देशाच्या मोठ्या भूभागाला मिळणार आहे.
औष्णिक प्रकल्पांपेक्षाही घातक! कचऱ्यापासून वीज निर्मिती की प्रदूषणाचा महाधोका? अहवालाने उडवली खळबळ
महाराष्ट्रातून या मार्गिकेचा सुमारे 178 किलोमीटरचा भाग जात असून, त्यासाठी जवळपास 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
जागतिक पुरवठा साखळीचा महत्त्वाचा भाग बनण्यासाठी देशातील लॉजिस्टिक्स खर्च कमी करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लॉजिस्टिक्स खर्चात घट झाली असून, समर्पित मालवाहतूक मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर त्यात आणखी सुधारणा होईल, असा दावा त्यांनी केला. यामुळे भारताची जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढण्यासोबतच रोजगारनिर्मितीलाही चालना मिळेल, असे फडणवीस यांनी सांगितले.
जेएनपीटीच्या विस्तारासोबतच वाढवण बंदराचा विकास सुरू आहे. या दोन्ही बंदरांना सक्षम रेल्वे मालवाहतूक जोडणी मिळाल्यास महाराष्ट्राला देशातील महत्त्वाचे Maritime Power आणि Global Logistics Hub म्हणून विकसित करण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
यावेळी डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार यांनी पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेची क्षमता, बांधकामातील अभियांत्रिकी आव्हाने आणि जेएनपीटीशी जोडणीमुळे मालवाहतुकीला मिळणाऱ्या गतीची माहिती दिली. जपानच्या मुंबईस्थित वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्यदूत सातो हितोमी यांनीही प्रकल्प उभारणीत भारत-जपान सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले.






