
कराडमध्ये FDA ची धडक कारवाई! नामांकित बेकरीला ठोकले सील; पार्सल सेवेवरही निर्बंध
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जुन्या नामांकित बेकरीमध्ये अस्वच्छता असल्याबाबत विभागाकडे तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत उपायुक्त शिंगाडे आणि त्यांच्या पथकाने संबंधित बेकरीची तपासणी केली. या तपासणीदरम्यान तक्रारीच्या अनुषंगाने अस्वच्छता तसेच अन्य त्रुटी आढळून आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर पुढील आदेश मिळेपर्यंत बेकरी सील करण्याची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, पार्सल सेवा पुरविणाऱ्या एका नामांकित कंपनीवरही अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली असून, संबंधित सेवेचे कामकाज बंद ठेवण्याबाबत निर्बंध घालण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या पार्सल सेवेचे नाव आणि कारवाईचे नेमके कारण याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आज (ता. १७) येथे पालिकेच्या व्याख्यानमालेसाठी येणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विभागाने केलेल्या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत अन्नपदार्थांच्या स्वच्छतेसह अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी प्रशासनाकडून केली जात असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
याचदरम्यान, एफडीएने महाराष्ट्रात अन्न भेसळ, प्रतिबंधित खाद्यपदार्थांची विक्री आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन यांविरुद्ध व्यापक कारवाई केली आहे. विभागाने ३० सप्टेंबरपर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार, प्रतिबंधित खाद्यपदार्थ आणि इतर अन्न सुरक्षा उल्लंघनाच्या प्रकरणांमध्ये एकूण ७८.४९ कोटी रुपयांचे खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
१,४७२ ठिकाणी शोध आणि जप्ती मोहीम राबवण्यात आली.
अंदाजे २७.८५ कोटी रुपयांचे प्रतिबंधित खाद्यपदार्थ जप्त.
१,१७५ एफआयआर नोंदवण्यात आले.
१,५२९ अटक झाल्याचे वृत्त आहे; याची पुष्टी प्रसिद्धीपत्रकाद्वारे होणे बाकी आहे.
९६ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल.
८३७ आस्थापना सील करण्यात आल्या.
अंदाजे १३.६१ कोटी रुपये किमतीची २०५ वाहने जप्त.
FDA चा औषध माफियांना दणका! ६ महिन्यांत ४,७२३ तपासण्या, १,५८१ परवान्यांवर कारवाई; १५ जणांना अटक