कर्जत/संतोष पेरणे : तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या पाथरज आदिवासी आश्रम शाळेतील मुलांकडून अग्निशमन सिलेंडर फुटला. या कारणावरून प्रभारी मुख्याध्यपकांनी विद्यार्थ्याला छडीने मारले. या मारहाणीत मुलाच्या हातावर वळ उठले आहेत. ही घटना समजताच आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते आश्रम शाळेत येऊन घडल्या प्रकाराची माहिती घेतली.
पाथरज आदिवासी आश्रम शाळेतील बारावीच्या काही विद्यार्थ्यांनी अग्निशमन सिलेंडर बाथरूम मध्ये नेऊन फोडले. हे आश्रम शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांना समजले. त्यांनी हा प्रकार कुणी केला? हे विचारण्यासाठी बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना विचारले. परंतु एकही विद्यार्थी नाव सांगत नव्हता म्हणून त्या रागात बनसोडे यांनी चार विद्यार्थ्यांना छडीने मारले. त्यांच्या मारण्याने मुलांच्या हातावर छडीचे वळ उठले. मात्र याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी कोणतीही तक्रार केली नाही.
ही घटना समजताच आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते आश्रम शाळेत आले. त्यांनी मुख्याध्यापक बनसोडे यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. सर्व परिस्थिती त्यांच्याही लक्षात आली. बनसोडे यांनी ‘ मी विद्यार्थ्यांना दोन दोन छड्या मारल्या. ही माझ्याकडून चूक झाली. कोणताही रोष ठेऊन मी मारले नाही. मुलांना शिस्त लागावी. त्यांनी गैरवर्तन करू नये म्हणून माझ्याकडून हे घडले.’ असे स्पष्ट केले. तसेच विद्यार्थ्यांनीही चूक मान्य करून पुन्हा असे प्रकार करणार नाही. असे सांगितले.
विद्यार्थ्यांना मारणे ही चूकच आहे. ही चूक प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांनी मान्य केली आहे. यापुढे असे कृत्य होणार नाही. याची दक्षता घेतली जाईल.असं कर्जतचे गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी सुद्धा जुलै महिन्यातच त्यावेळच्या बारावीच्या विदयार्थ्यांनी अग्निशमन सिलेंडर आपटून फोडला होता आणि यावर्षी सुद्धा तोच प्रकार यावेळच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी केला. या स्फोटामुळे मुलांचे शारिरीक नुकसान होऊ शकते.