ठाणे/स्नेहा जाधव,काकडे : गेले दोन दिवस मुसळधार पावसाने ठाणे शहर ठप्प झालं होतं. मात्र आता पाऊस थांबला असला तरी राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा संताप अजूनही तेवढाच आहे. या रोषात देखील माणुसकीचं दर्शन दिसले आहे. आंदोलनाच्या ठिकाणी रुग्णांसाठी अनेकांनी स्वखुशीने रक्तदान केलं यातून हेच समोर आलं की, संघर्ष फक्त हक्कांसाठी नाही, तर कर्तव्य निभावण्यासाठीही असतो.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद प्रवेशद्वारानंतर आज सिव्हिल रुग्णालयात आंदोलन आणखी तीव्र झालं. आरोग्यसेवा विस्कळीत झाली आहे. दोन दशकं साथीचे आजार, कोविड महामारी, दुर्गम भागातील आपत्कालीन सेवा अशा काळात प्राण पणाला लावणारे हेच कर्मचारी आज स्वतःच्या न्याय्यासाठी रस्त्यावर लढत आहेत. “आम्ही जनतेच्या आरोग्याचा कणा आहोत, मग आम्हालाच न्याय का नाही?” असा जळजळीत सवाल देखील करण्यात आला आहे.
शासन निर्णय दिनांक 14-03-2024 नुसार समायोजन 67 संवर्ग करण्यात यावे
परफॉर्मन्स रिपोर्टनुसार 10 टक्के वेतनवाढ तात्काळ लागू करावी.
5 व 7 वर्षे पूर्ण झालेल्यांना लॉयल्टी बोनस द्यावा.
EPF व ग्रॅच्युइटी योजना 15,000 वरील मानधन घेणाऱ्या सर्वांना लागू करावी.
50 लाख अपघाती व 25 लाख नैसर्गिक मृत्यू विमा संरक्षण मिळावे.
CHO पदासाठी नियमित 40,000 वेतन द्यावे.
अन्यायकारक Not Satisfactory अहवाल थांबवावेत.
दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक/Face Recognition मधून सवलत द्यावी.
पावसाचा धोका ओसरला असला तरी साथीचे आजार डोके वर काढत आहेत, रुग्णालयांवर प्रचंड ताण आहे. अशा वेळी आरोग्य कर्मचारीच रस्त्यावर उतरावे लागत आहेत, या आंदोलनावेळी मनीष खैरनार, प्रदीप पाटील, विनोद जोशी, जयवंत विशे, रोशन पाटील, संगीता मोरे, ऍड.अर्चना शेंगोकार यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी व अधिकारी ठाम उपस्थित होते.
आंदोलनाच्या तिव्रतेतही कर्मचाऱ्यांनी माणुसकीचं उदाहरण घातलं. जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असताना आंदोलकांनीच रक्तदान करून वेगळा आदर्श घालून दिला. “आम्ही न्याय मागतोय, दया नाही!” या घोषणांसोबत रक्तदानाची ही देणगी आंदोलनाला वेगळीच ऊंची देऊन गेली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत येणारे अधिकारी आणि कर्मचारी यांचा राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन आहे. ठाणे जिल्ह्यातील सुमारे 600 कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत.“आम्ही न्याय मागतोय, दया नाही. 10-15वर्षं रक्त-घाम गाळूनही जर कायमस्वरूपी सेवा नसेल,तर कोणतीही तडजोड नाही…लढा शेवटपर्यंत सुरूच राहील!”, असं राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्री कारण समितीचे मनीष खैरनार यांनी सांगितलं आहे.