गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय!
कोकणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या सोडाव्यात यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच कोकणातील महायुतीचे सर्व खासदार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. सातत्याने होत असलेल्या मागण्यांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या आणि विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल दोन्ही खासदारांनी सर्व खासदारांच्या वतीने रेल्वे मंत्रींचे विशेष आभार मानले.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. मुंबईसह देशभरात नोकरी-व्यवसाय करणारे कोकणवासी दरवर्षी या उत्सवाच्या निमित्ताने गावी परतण्याची आतुरतेने वाट पाहतात. घराघरात बाप्पा येतो, गावागावात मंगलमय वातावरण निर्माण होते. मात्र या उत्साहात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाशी संवाद साधून अनेक सूचना केल्या. विशेष म्हणजे त्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यांची अंमलबजावणी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे.
यावर्षी कोकण रेल्वेने मध्य, पश्चिम व दक्षिण रेल्वेसोबत समन्वय साधून तब्बल ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई, पनवेल, वडोदरा, बेंगळुरू, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी व मडगाव येथून चाकरमान्यांना गावी जाणे अधिक सोयीस्कर होणार आहे. प्रवाशांच्या आरोग्य सुरक्षेसाठी २५ ऑगस्टपासून खेड, माणगाव, चिपळूण, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी रोड येथे पॅरामेडिकल कर्मचारी तैनात राहतील. चिपळूण व रत्नागिरीतील आरोग्य केंद्रात २४ तास डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपलब्ध असतील तर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका तत्पर असतील, अशी माहिती खासदार म्हस्के यांनी दिली.
प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, विशेष तिकिट रांगा, प्री-प्रिंटेड तिकिटे, यात्री सहायता केंद्रे आणि एसटी बसची सोय करण्यात आली आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष तपासणी, सीसीटीव्ही निगराणी, RPF व स्थानिक पोलिसांचा समन्वय करण्यात आला आहे. तसेच स्थानकांची स्वच्छता, आकर्षक सजावट, विशेष प्रकाशयोजना, रांगोळ्या, पूजा साहित्य व मिठाई स्टॉल्स, संगीत-कलासादरीकरण आणि सेल्फी पॉइंट्स या माध्यमातून प्रवासालाही उत्सवी रंग देण्यात आला आहे.
सातत्याने गणेशभक्तांसाठी मांडलेल्या मागण्या गांभीर्याने स्वीकारून रेल्वे प्रशासनाने या योजना राबवल्याबद्दल श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्रींचे आभार मानले आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सुरक्षित व आनंददायी व्हावा आणि त्यांच्या घरी बाप्पाचे आगमन सुख-समाधान घेऊन यावे, अशी प्रार्थना नरेश म्हस्के यांनी केली.