कल्याण पश्चिम येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसून येत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील इमारतींमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. गोविंदवाडी बायपास रोडवर असलेल्या इमारतीवर महापालिकेची कोणतेही परवानगी न घेता लग्नाचा हॉल उभारण्यात आला.
या अनधिकृत बांधकामाबाबत अनेकदा तक्रारी केल्या मात्र साधी चौकशी करायची तसदी केडीएमसीने घेतली नाही. असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते रवी गायकवाड यांनी पालिकेवर ताशेरे ओढले आहेत. याबाबत केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी संबंधित प्रकरणाची चौकशी करु असं सांगितलं आहे. या चौकशीदरम्यान अनधिकृत बांधकाम आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे आश्वासन देखील गोडसे यांनी दिलं आहे.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारती शेतकऱ्यांसाठी राखीव आहेत. मात्र याचा गैरवापर होत असल्याचं सामाजिक संघटनेने आरोप केला आहे. इमारतींवर नियमबाह्य पद्धतीने बांधकाम केलं आहे. या इमारतींच्या टेरेसवर महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता मंगल कार्यालय हॉटेल सुरू करण्यात आले .याबाबत केडीएमसी उपायुक्त्यांकडे अनेकदा तक्रारी केल्या मात्र कोणतेही कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदार गायकवाड यांनी केली.
गोविंदवाडी बायपास रोडवर असलेल्या एका इमारतीच्या टेरेसवर थेट भला मोठा मंगल कार्यालय थाटण्यात आले .यासाठी महापालिकेकडून कोणतीही परवानगी घेण्यात आलेले नाही. हा सगळा गैरप्रकार होत सुरु असून एखादी दुर्घटना घडल्यास या ठिकाणी जीवित हानी होऊ शकते. त्यामुळे केडीएमसीने तत्काळ या बांधकामांवर कारवाई करावी. अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास विलंब केलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता रवी गायकवाड यांनी केली आहे. दरम्यान या सगळ्य़ा गैरप्रकारावर पालिका काय ठोस भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.