डोंबिवली : सार्वजनिक वाहतूक यंत्रणेत वाहतूक कोंडी आणि मुजोरपणा यामध्ये साधारणपणे रिक्षा चालक आघाडीवर असल्याचे बोलले जाते. मात्र काही वेळा अवजड वाहने व बस चालकही अशाप्रकारे रेटारेटी करीत असतात. परंतु आता केडीएमसी (KDMT Bus Accident) बस चालकांनीही अशा प्रकारच्या दडपशाहीमध्ये उडी घेतली आहे. शुक्रवारी भर दुपारी तळपत्या उन्हात केडीएमसी बस चालकाने वळण रस्त्यावर रिक्षा चालकावर दडपशाही करीत चक्क रिक्षाला चेपले. सुदैवाने या घटानेमध्ये रिक्षाचालकाला कोणतीही दुखापत झाली नाही मात्र रिक्षाचे काही प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. (Kalyan Dombivali News)
डोंबिवली पूर्व येथील केडीएमसी बस डेपोमधून दुपारी सुमारे 2:00 वाजण्याच्या सुमारास निवासी विभागात बस क्रमांक 55 निघाली होती. दरम्यान पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालय आणि पी.पी. चेंबर्स वळणावर बस चालकाने समोरून येणाऱ्या एमएच05 बीजी 9151 या रिक्षेला वळणावरच उजव्या बाजूला चेपलं. रिक्षा आणि बस एकमेकांत अडकलेल्या स्थितीत असतांनाच रिक्षा चालक यामध्ये अडकला. तरबेज बस चालकाने नियमानुसार मागच्या टायरखासली रिक्षा येणार अशा स्थितीत बस थांबवली आणि स्वतःच आरडाओरडा सुरू केली. पण या दरम्यान दुचाकी प्रवाश्यांनी बस चालकाला धारेवर धरून तुझी चूक आहे असे खडे बोल सुनावले. या बाचाबाचीत अनेकांनी बस चालकाची चूक लक्षात आणून दिल्यावर बस चसलकाने आपली चूक कबुल केली.
या प्रकरणी रिक्षा चालक वयस्कर असल्याने त्याने फक्त माझी नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली. पण त्याही परिस्थितीत बस चालकाने वाहतूक कोंडीचे कारण देत बस तिथून बाहेर काढत पळ काढला. अखेर काही प्रतिष्ठित डोंबिवलीकरांनी वयस्कर रिक्षा चालकाची समजूत काढली. मात्र या घटनेमुळे केडीएमसी बस चालकाची आता शहरातील रस्त्यावर दडपशाहीत वाढत चालल्याचं अधोरेखित झालं आहे. याबाबत केडीएमटी बस डेपो महाव्यवस्थापक संदीप भोसले यांच्याशी या घटनेबाबत बोललो असता त्या प्रकाराची योग्य ती चौकशी करू आणि बस चलकाला समज देऊ असं सांगितलं.