पुणे / दीपक मुनोत : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) महाराष्ट्रात वेगळे चित्र निर्माण केल्याने महाविकास आघाडीचे राजकारण टिकून राहण्याची शक्यता ठोस आहे. या उलट महायुतीच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याने महायुती आगामी काळात टिकून राहते की नाही याची शंका असून, याचे दूरगामी परिणाम विधानसभा निवडणुकांवर होणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांचा त्याला अपवाद नाही.
बारामती लोकसभा मतदारसंघात सहापैकी चार ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत, तर दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाचा आमदार असलेला खडकवासला विधानसभा मतदारसंघ वगळता बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी या ५ मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना भरघोस मताधिक्य मिळाले. सुनेत्रा पवार यांना केवळ खडकवासला मतदारसंघात २० हजार ७४६ मतांची आघाडी मिळाली.
अजित पवार विरुद्ध रोहित पवार?
अजित पवार यांचे सतत ५ निवडणुकांमध्ये वर्चस्व असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना तब्बल ४८ हजार १६८ मतांची आघाडी मिळाली आहे. ‘दिल्लीत ताई बारामतीत दादा’ या मानसिकतेतून बारामतीकरांनी ताजा निकाल दिला आहे. विधानसभा निवडणुकीत स्वतः अजित पवार यांना रिंगणात उतरावे लागेल. अन्यथा त्यांचे राजकीय अस्तित्व निस्तेज होऊ शकते. आजपर्यंत भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेला अनेक प्रयत्न करुनही या मतदारसंघात यश आले नाही. आगामी निवडणुकीत अजित पवार विरुद्ध महाआघाडीतून रोहित पवार अशीही लढत होऊ शकते.
भोर वेल्हा आणि मुळशी मध्ये गेल्या ३ विधानसभा निवडणुकांपासून काँग्रेसचे संग्राम अनंतराव थोपटे हे प्रतिनिधित्व करत आहेत. पुरंदर मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे संजय चंदूकाका जगताप निवडून आले. या दोन्ही आमदारांचे वडील दीर्घकाळ आमदार किंवा मंत्री होते. काँग्रेसनिष्ठ होते. महायुतीचे, महाविकास आघाडीचे राजकारण टिकून राहिले तर या दोघांना पुन्हा संधी देणे काँग्रेसला क्रमप्राप्त आहे.
पुरंदरमध्ये गेल्या वेळेचीच लढत
पुरंदर मतदारसंघातूनदेखील सुळे यांना ३४ हजार ३८७ मतांची आघाडी मिळाली. गेल्या निवडणुकीत संजय जगताप यांनी शिवसेनेकडून पुरंदर खेचून घेतला. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची साथ त्यांना होती. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे विजय शिवतारे यांना मतदारांनी नाकारले. यंदाच्या निवडणुकीत शिवतारे शिंदे गट शिवसेनेकडून प्रबळ दावेदार असणार आहेत.
लोकसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा वैयक्तिक निर्णय त्यांनी अखेरच्या क्षणी महायुतीचा धर्म पाळून मागे घेतला. लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात महाआघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. त्यामुळे संजय जगताप विरुद्ध विजय शिवतारे अशी लढत पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भोरमध्ये थोपटेंचे वर्चस्व
पुरंदर सारखीच परिस्थिती भोर वेल्हा मुळशी मतदारसंघात आहे. संग्राम थोपटे चवथ्यांदा काॅंग्रेसचे उमेदवार असू शकतात. त्यांना साथ देणे शरच्चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसला भाग आहे आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटालाही क्रमप्राप्त आहे.
बारामतीनंतर भोर विधानसभा मतदारसंघाने सुळे यांना ४१ हजार ६२५ मतांची आघाडी दिली. शरद पवार यांचा अनंतराव थोपटे यांना भेटण्याचा डाव अतिशय यशस्वी ठरला. यापूर्वी थोपटे व पवार यांच्या संघर्षातून भोर मतदारसंघातून सुळे यांना कधीही मताधिक्य मिळाले नव्हते.
महायुतीच्या किंवा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी सोडावा लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना आघाडी, युती धर्म पाळावा लागेल. भोर, वेल्हा आणि मुळशीत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे कुलदीप कोंडे यांनी संग्राम थोपटे यांना चांगली लढत दिली होती. ते लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटात होते.
सुप्रिया सुळे यांनी जाहीर सभेत कुलदीप कोंडे यांच्या पत्नीचा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जरुर विचार करु असे आश्वासन दिले त्यानंतर कोंडे काळाची पावले ओळखून एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे तेच थोपटे यांच्या विरोधात असू शकतात. इंदापूर आणि दौंड हे दोन्ही मतदारसंघ सुनेत्रा पवार यांना मदत करतील असे वाटत होते. मात्र, इंदापूरमधून २५ हजार ६८९ तर दौंडमधून २५ हजार ५३१ मतांची आघाडी सुळे यांना मिळाली.
या आकड्यांवरून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे व दौंडचे आमदार राहुल कुल यांची निवडणुकीतील प्रभावहीनता दिसून येते. कुल यांच्या राहू या गावातही तुतारीच जोरदार वाजली तर अजित पवार गटाचे माजी आमदार रमेश थोरात यांच्या खुटबाव या गावातही तुतारीच फुंकली गेली.
दौंडमधून राहुल कुल लढणार
विधानसभा निवडणुकीत दौंड मधून राहुल कुल हेच महायुतीचे भाजप चिन्हावर लढणारे उमेदवार असण्याची शक्यता आहे. त्यांनी गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांना पराभूत केले होते. थोरात आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटात आहेत. त्यामुळे कुल तयांच्या विरोधात तुल्यबळ प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून द्यावा लागेल. तसे नाव सध्या चर्चेत नाही.
इंदापूरमध्ये पाटील-भरणे
इंदापूर तालुक्यात विद्यमान आमदार दत्ता भरणे महायुतीत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या छत्रछायेखाली गेलेले, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हेही महायुतीत आहेत. पाटील लोकसभेच्या निवडणुकीसाठी तीव्र इच्छूक असताना त्यांना सहकार क्षेत्रातील मोठे पद भाजपने देऊन नाराजी दूर केली. तरीही ते आगामी निवडणुकीत भाजपचे उमेदवार असू शकतात. दत्ता भरणे कोणत्याही क्षणी तुतारी हाती घेऊ शकतील,अशी चर्चा आहे.
खडकवासल्यात पुन्हा गेल्या वेळेची लढत?
सुनेत्रा पवार यांना एकमेव दिलासादायक निकाल हा खडकवासला विधानसभा मतदारसंघातून मिळाला. खडकवासला विधानसभा मतदारसंघ निमशहरी आहे. जुन्या पुण्यातून स्थलांतरित झालेले मतदार मोठ्या प्रमाणात असून गेल्या काही निवडणुकांमध्ये त्यांचे मतदान मूळ ग्रामस्थांपेक्षा वरचढ ठरते आहे.
शहरी मतदार असल्याने तसेच याठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार असल्याने सुनेत्रा पवार यांना २१ हजार ६९६ मतांची आघाडी मिळाली. सिंहगड रोड, धायरी, कोथरूडचा काही भाग, नांदेड सिटी या परिसरात घड्याळाला आघाडी मिळाली तर खडकवासला ग्रामीण भागात तुतारीचीच चलती होती.
महायुतीत भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली होती. भाजपचे भिमराव तापकीर यांना अवघ्या ३ हजार मतांनी विजय मिळवता आला.
यंदा राष्ट्रवादीमध्ये फूट आहे. गेल्या निवडणुकीत तापकीर यांच्या विरोधात लढलेले सचिन दोडके पुन्हा शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे, महाविकास आघाडीकडून उमेदवार असू शकतात. भारतीय जनता पक्षाकडे सध्या कमकुवत परिस्थितीत प्रभावी चेहरा नसल्याने तापकीर यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.