कोल्हापुरात सतेज पाटलांना धक्का (फोटो- टीम नवराष्ट्र)
कोल्हापूर/दीपक घाटगे: यंदाच्या १५ व्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील दहापैकी नऊ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. लाडकी बहीण योजना आणि ‘एक है तो सेफ है’ या घोषणेच्या माध्यमातून मतांचे झालेले ध्रुवीकरण, यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी तडीपार झाली. शिवाय ‘वंचित’ आणि परिवर्तन महाशक्ती आघाडी यांच्या महायुतीच्या झंजावाताचा पालापाचोळा झाला आहे. तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील जिल्ह्याच्या राजकारणात बॅक फुटवर गेले, तर महाडिक गटाला उभारी मिळाली आहे. ‘मविआ’ आणि महायुती यांनी आपल्या राज्यस्तरीय प्रचाराचा नारळ ऐतिहासिक कोल्हापुरातून फोडला होता. मात्र जनसमर्थन महायुतीला मिळाले आहे.
कोल्हापूर उत्तरमधून शिंदे गटाच्या शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे अपेक्षेप्रमाणे विजयी झाले. त्यांच्या विजयात अप्रत्यक्षपणे कोल्हापूरच्या राजघराण्याचे योगदान आहे. काँग्रेसची मिळालेली उमेदवारी मधुरिमाराजे छत्रपती यांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमयरित्या मागे घेतल्याने क्षीरसागर यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचारांच्या मतांची विभागणी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. ठाकरे गटाच्या शिवसेनेची मते महायुतीकडेचं वळली.
मतांच्या ध्रुवीकरणाचाच हा दृश्य परिणाम असावा असे म्हणावे लागेल. कोल्हापूर दक्षिण या विधानसभा मतदारसंघात मतदारांचा कौल आलटून पालटून असतो. इथे भाजपचे अमल महाडिक मोठे मताधिक्य मिळवून विजयी झाले. त्यांनी सतेज पाटील यांचे पुतणे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचा धोबी पछाड पराभव केला. आणि महाडिक यांनी २०१९ चा वचपा काढला. या मतदारसंघात सतेज पाटील विरुद्ध महाडिक असा पारंपरिक सामना होता. हा मतदारसंघ कधी काँग्रेसकडे तर कधी भाजपाकडे असा राहिला आहे. अमल महाडिक यांच्या विजयाने महाडिक गटाला उभारी मिळाली आहे.
हेही वाचा: ‘ताकद दाखवू’ असे म्हणणाऱ्या सतेज पाटलांच्या कोल्हापुरातच काँग्रेसला धक्का; एकही जागा नाहीच !
करवीरमध्ये चुरशीच्या वाटणाऱ्या लढतीत नरकेंना मताधिक्य
करवीर मतदार संघामध्ये काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील विरुद्ध शिवसेनेच्या शिंदे गटाचे चंद्रदीप नरके यांच्यात लढत होती. ती अतिशय चुरशीची होणार, तसेच राहुल पाटील यांना मतदारांची सहानुभूती मिळणार असे वातावरण होते. पण नरके यांनी मिळवलेले मताधिक्य पाहता राहुल यांचा मोठ्ठा पराभव झाला आहे. या मतदारसंघात शेकापचे संपत पाटील यांनी आघाडी धर्म पाळत सक्रिय होऊन पाळला आहे असे दिसत नाही. २०१९ मध्ये चंद्रदीप नरके यांचा निसटता पराभव झाला होता. काँग्रेसचे खा. शाहू महाराज छत्रपती, आ. सतेज पाटील यांच्यावर राहुल पाटील यांच्या विजयाची मोठी जबाबदारी होती. मात्र विधानसभेत मिळालेल्या आकडेवारीवरून त्यांनी जबाबदारी नीटपणे पार पाडलेली नसल्याचे दिसते. शाहू महाराज छत्रपती यांना लोकसभा निवडणुकीत दि. आमदार पी. एन. पाटील यांनी मोठे मताधिक्य दिले होते.
कागल
कागल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक शरद पवार यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. समरजीतसिंह घाटगे हे त्यांचे उमेदवार होते. पण विद्यमान पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विजयाचा षटकार मारला आहे. विजय मिळवताना त्यांनी मोठे मताधिक्यही घेतले आहे. या मतदारसंघात पक्षीय पातळीवरील उमेदवार असले तरी इथे गटाचे राजकारणच आत्तापर्यंत चालत आले आहे. शरद पवार यांच्या भगिनी, तसेच एन. डी. पाटील यांच्या पत्नी श्रीमती सरोज पाटील यांनीही मुश्रीफ यांचा पाडावं करण्यासाठी इथे प्रचार सभा घेतल्या होत्या.
आवाडेंनी विनले विजयाचे वस्त्र, चंदगडला ‘अपक्ष’ला भाजपची रसद
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही शरद पवार यांनी मदन कारंडे यांना उमेदवारी दिली होती. कारंडे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत त्यांचं भाषण चालू असताना मुसळधार पाऊस पडला. हा पाऊस अंगावर झेलत शरद पवार यांनी भाषण केले. पण त्यांच्या उमेदवारावर मतांची बरसात काही झाली नाही. दीड दोन महिन्यापूर्वी भाजपात दाखल झालेले राहुल आवाडे यांनी या मतदारसंघात चांगले मताधिक्य घेऊन विजयाचे वस्त्र विणले आहे. चंदगडमध्ये अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी आश्चर्यकारक मुसंडी मारून विजयश्री खेचून आणली. अजित पवार गटाचे राजेश पाटील, शरद पवार गटाच्या नंदाताई बाभुळकर यांचा पराभव झाला. नंदाताईंचे चुलत बंधू त्यांच्या विरोधात होते. तर अपक्ष शिवाजीराव पाटील यांना भाजपची रसद होती.
आबिटकरांची विजयाची हँट्रट्रिक, शाहुवाडीत पुन्हा कोरेंची बाजी
शिरोळ मध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दत्त साखरचे गणपतराव पाटील यांना चितपट केले. हातकणंगले राखीव मतदार संघात जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार दलित मित्र अशोकराव माने यांनी विजयाची गुढी उभारली. त्यांनी डॉ. सुजित मिणचेकर, विद्यमान आ. राजूबाबा आवळे यांचा पराभव केला. राधानगरी भुदरगडमध्ये महायुतीच्या प्रकाश आबिटकर यांनी विजयाची हॅट्रिक केली. आणि याच मतदारसंघात माजी आमदार के. पी. पाटील यांच्या पराभवाची हॅट्रिक झाली. के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांची बंडखोरी झाली नसती तरी के. पी. यांना विजयापर्यंत पोहोचता आले आसते. शाहूवाडीमध्ये सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील यांचे नाव चांगलेच चर्चेत होते. तथापि जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी या मतदारसंघावर पुन्हा एकदा आपले नाव कोरले आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघाचा विचार केला असता राज्यात जे घडले त्याचे स्वच्छ प्रतिबिंब कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पडले असे चित्र या निवडणुकीत दिसून आले आहे.