संग्रहित फोटो
तळागाळातील कार्यकर्त्यांमध्येही फूट
फुटीनंतर या पक्षाचे दोन गट पडले – एक शरद पवार यांच्याशी निष्ठा राखणारा आणि दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट. या विभाजनाने केवळ नेत्यांमध्येच नाही तर तळागाळातील कार्यकर्त्यांमध्येही मोठी फूट पडली आहे. अनेक कार्यकर्ते कोणत्या गटात राहायचे, कोणाचा झेंडा घ्यायचा या द्वंद्वात सापडले आहेत. जिल्हास्तरावर तर परिस्थिती अधिक गुंतागुंतीची आहे. अनेक ठिकाणी दोन्ही गट एकाच शाखेच्या नावावर हक्क सांगत असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारी क्षेत्र, शिक्षण संस्था आणि नगरपालिका निवडणुका यामध्ये भक्कम पाय रोवला होता. पण फुटीनंतर यांच्या मध्येही सत्तांतर घडले. काही ठिकाणी अजित पवार गटाने आपले वर्चस्व निर्माण केले, तर काही ठिकाणी जुने शरद पवार गटाचे पदाधिकारी आपले स्थान टिकवून आहेत. कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रमाचे वातावरण आहे. अनेकांनी या राजकीय अनिश्चिततेमुळे सक्रिय राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले आहे.
तिन्ही आघाड्यांवर राष्ट्रवादी तणावाखाली
आताच्या निवडणुका लक्षात घेता दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे. अजित पवार गट सत्ताधारी भाजपसोबतच्या युतीत राहून राजकीय लाभ घेण्याच्या प्रयत्नात आहे, तर शरद पवार गट स्वतंत्र ओळख जपून लढण्याचा निर्धार व्यक्त करतो आहे. तथापि, दोन्ही गटांच्या अंतर्गत संघटनांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो. प्रचाराची रणनीती, उमेदवारी निश्चिती आणि कार्यकर्त्यांचे मनोबल या तिन्ही आघाड्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस आज तणावाखाली आहे.
शरद पवार यांच्या अनुभवावर पक्षाचा पाया
“राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद तिच्या संघटनेत आणि तळागाळातील निष्ठावान कार्यकर्त्यांत होती. पण फुटीनंतर ही शक्ती दोन तुकड्यांत विभागली गेल्याने पक्षाची ओळख धुसर होत चालली आहे. दोन्ही गट वेगवेगळे उमेदवार उभे करत राहिले, तर मतविभाजन अटळ आहे आणि त्याचा थेट फायदा विरोधकांना मिळू शकतो.” शरद पवार यांच्या अनुभवावर आणि अजित पवार यांच्या प्रशासन कौशल्यावर पक्षाचा पाया टिकून आहे, पण तळागाळातील एकजूट हे मोठे आव्हान ठरले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा यांसारख्या पश्चिम महाराष्ट्रातील पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कमी होत असल्याचे चित्र आहे.
फुटीनंतर कार्यकर्त्यांची ससेहोलपट
फुटीनंतर कार्यकर्त्यांची ससेहोलपट, निष्ठांचा बदलता खेळ आणि राजकीय अनिश्चितता यामुळे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या ताकदीने मैदानात उतरेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पक्षाची जुनी परंपरा आणि पवार कुटुंबाचे नेतृत्व या दोन्ही गोष्टी कार्यकर्त्यांना एकत्र आणू शकतील का, हा प्रश्न सध्या सर्वत्र चर्चेत आहे. एकेकाळी राज्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या या पक्षासमोर आज अस्तित्व टिकवण्याचे संकट उभे राहिले आहे. फुटीनंतर निर्माण झालेल्या या राजकीय वादळातून राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःला सावरून पुन्हा उभारी घेऊ शकेल का, याकडे लक्ष लागले आहे.






