
जगात भारी सायकल वारी... एकच गाव कोरेगाव, १०० हून अधिक सायकल प्रेमी पंढरपूरकडे रवाना
येथील कोरेगाव सायकल प्रेमी फाऊंडेशनच्या वतीने गेल्या चार वर्षापासुन पंढरपूर सायकल वारी आयोजीत करण्यात येते. या वारीचे यंदाचे पाचवे वर्ष आहे. आज सकाळी सहा वाजता येथील सरस्वती विद्यालयाच्या मैदानावर कोरेगाव शहर व परिसरातील सुमारे शंभरवर सायकल प्रेमी आपल्या सायकलसह दाखल झाले. सर्वानी वारीसाठी नोंदणी केल्यानंतर सायकल चालवण्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या हेमंत ढवळे, विवेक देशमुख व विरश्री मदने यांचा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवकृपा सहकारी पतपेढीच्या वतीने संचालक संतोष चव्हाण, विभागीय अधिकारी संतोष देशमुख यांच्या हस्ते पर्यावरणपूरक पिशव्या भेट देण्यात आल्या. आमदार शिंदे यांनी सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने सुदृढ आरोग्यासाठी अधिकाधिक सायकल वापरण्यासाठी केला जात असलेल्या प्रसार, प्रचाराचे रस्तेच सायकल वारी उपक्रमाचे कौतुक करून सर्व सायकल पटूना सहकार्य करण्याचे आवाहन केले. सायकल चालवण्यासाठी वेगळा ट्रॅक उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
सत्कार सोहळ्यानंतर सर्व सायकल पटूनी मैदानावर गोल रिंगण करत जगात भारी सायकल वारी…एकच गाव कोरेगाव अशा घोषणा देऊन आसमंत दुमदुमून सोडले. त्यानंतर आमदार शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर सायकल वारीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.
यावेळी कोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरुण देवकर, कोरेगावचे उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर बाचल, कोरेगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोसावी, सचिव डॉ. रोहित बर्गे, गजाभाऊ बर्गे, चंद्रकात बर्गे, सुधाकर बर्गे, सचिन बर्गे, फाऊंडेशनचे संस्थापक संजय दीक्षित, सागर भुंजे आदी उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन बर्गे यांनी प्रास्ताविक केले. सुहास गोळे, आमिर आतार यांनी सूत्रसंचालन केले.