
फोटो सौजन्य सोशल मीडिया
विशेष म्हणजे, राज्यातील ४७ श्वानांना मागे टाकत त्याने ‘बेस्ट डॉग ऑफ कम्पिटिशन’ हा मानाचा किताबही पटकावला. आता मुंबईत होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत साताऱ्याची सुवर्णपदकांची परंपरा कायम राखण्याचे आव्हान आझादसमोर असणार आहे.
पुणे येथे ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान २१ वा राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळावा पार पडला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील २४ पोलीस संघांचे एकूण ४७ श्वान सहभागी झाले होते. सातारा पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातील (बीडीडीएस) आझादने आपल्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्फोटकांचा शोध घेण्याच्या स्पर्धेत त्याने ४०० पैकी तब्बल ३५५ गुण मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली. प्रतिस्पर्धी श्वानांना मागे टाकत त्याने आपले वर्चस्व सिद्ध केले.
आझादने केवळ स्फोटक शोधण्याच्या प्रकारातच नव्हे, तर आज्ञाधारकपणा आणि अन्न नकार या दोन प्रकारांतही सुवर्णपदके मिळवली. पोलिसांच्या आदेशांचे अचूक पालन करणे आणि अनोळखी व्यक्तीकडून दिलेले अन्न न स्वीकारणे, अशा महत्त्वाच्या कौशल्यांचे त्याने प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, यंदापासून सुरू करण्यात आलेला ‘बेस्ट डॉग ऑफ कम्पिटिशन’ हा किताबही आझादने पटकावला. त्यामुळे तीन सुवर्णपदकांसह त्याने राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोच्च स्थान मिळवले.
Pune School Bus Accident : पुण्यात स्कूल बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले; तापकीर चौकात अपघात
आझादच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची मुंबई येथे होणाऱ्या ७० व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी निवड झाली आहे. यापूर्वी साताऱ्याच्या ‘सूर्या’ आणि ‘सूचक’ या श्वानांनी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली होती. आता सलग तिसऱ्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक मिळवण्याची संधी सातारा पोलीस दलाला आहे.
आझादच्या यशामागे त्याचे हँडलर पोलीस हवालदार रूपेश साळुंखे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण आहिरे यांचे मोलाचे योगदान आहे. वरिष्ठ अधिकारी, प्रशिक्षक आणि बीडीडीएस पथकाच्या मार्गदर्शनातून आझादने हे यश संपादन केले आहे.