
कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा 'डंका'! दीड लाख पर्यटकांची हजेरी; प्रतिसादाअभावी ९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
सातारा जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन सातारा आणि प्रादेशिक पर्यटन संचालनालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा सहभाग पाहायला मिळत आहे. निसर्गरम्य सह्याद्री पर्वतरांगांमध्ये साजरा होणारा हा महोत्सव येथील समृद्ध सांस्कृतिक वारसा, पर्यटनाच्या संधी आणि स्थानिकांच्या एकजुटीचा उत्सव साजरा करत आहे.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचा आमचा निर्धार आहे. तसेच स्थानिक युवकांना त्यांच्या परिसरात रोजगाराच्या संधी निर्माण करून सातारा हे आकर्षक पर्यटनस्थळ बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या यशातून प्रेरणा घेऊन डिसेंबर-जानेवारीमध्ये ‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल’ सुरू करण्याचाही आमचा मानस आहे. पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यटन विभागाने ग्रामीण पर्यटनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, महाराष्ट्राला देशातील सर्वोत्तम पर्यटन राज्य बनवण्यासाठी नियोजन केले आहे.
२ एप्रिल रोजी पाटण तालुक्यातील नाडे या निसर्गरम्य गावात महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई यांच्या हस्ते या महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. यावेळी पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील (भा.प्र.से), प्रधान सचिव (पर्यटन) श्री. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे श्री नीलेश गटणे (भा.प्र.से), सातारा जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील (भा.प्र.से), जिल्हा परिषद सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. याशनी नागराजन (भा.प्र.से), प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, मोरना एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष श्री. रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. यशराज देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत बोलताना पर्यटन मंत्री श्री. शंभूराज देसाई म्हणाले, कोयना दौलत डोंगरी महोत्सव हा केवळ एक कार्यक्रम नसून सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या निसर्गसौंदर्याचा, आपल्या सांस्कृतिक वारशाच्या समृद्धीचा आणि ग्रामीण जीवनशैलीच्या अनुभवाचा सुंदर संगम आहे. सर्वसामान्य नागरिकांनाही अशा दर्जेदार महोत्सवाचा अनुभव घेता यावा, यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतात, पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळते आणि पारंपरिक कला जतन होण्यास मदत होते.
या महोत्सवात पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच बोटिंग, जेट वॉटर अॅडव्हेंचर, पॅराग्लायडिंग, इलेक्ट्रिक बग्गी राईड्स अशा साहसी उपक्रमांचाही समावेश आहे. तसेच शस्त्रास्त्र प्रदर्शन, जत्रा आकर्षणे, कृषी व पशुधन प्रदर्शन, फूड फेस्टिव्हल आणि महिला बचत गटांचे स्टॉल्सही पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. राज्यभरातून आणि आसपासच्या शहरांतून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत असून महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेली ‘राधा’ ही जगातील सर्वात ठेंगणी म्हैस. तसेच भव्य ड्रोन शो, लेझर शो आणि संगीत कारंजे हे देखील पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. कृषी प्रदर्शनात स्मार्ट सिंचन, पीक निरीक्षण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानासह कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा शेतीमध्ये वापर कसा होतो, याचे प्रात्यक्षिक दाखवले जात आहे.
महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांनीही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. याची सुरुवात प्रख्यात शाहिर संतोष साळुंखे, शाहिर प्रसाद विभुते, शाहीर डॉ. देवानंद माळी आणि शहीर डॉ. निशिगंधा माने यांच्या दमदार शाहिरी पोवाडा सादरीकरणानी झाली. त्यानंतर ज्योतीताई श्याम गोराणे (जागर स्त्री शक्तीचा), अनिरुद्ध कर्कर (श्री संत ज्ञानेश्वर माऊली भजनी मंडळ), अभिमन्यू पंचाळ (स्वर भजनी मंडळ) आणि आदिनाथ सातळे गुरुजी (रंगी रंगे रे श्रीरंगे) यांच्या भजन सादरीकरणांनी वातावरण भक्तिमय केले. यानंतर स्वरणजली ब्रास बँड (लालबाग, मुंबई), प्रभात ब्रास बँड (पुणे), अमर ब्रास बँड (बारामती) आणि सरस्वती ब्रास बँड (जालना) यांच्या सादरीकरणांनी संगीताची मेजवानी दिली.
कार्निव्हल परेड आणि लावणी महोत्सवाने कार्यक्रमात रंगत आणली. सायली केळकर, राधिका पाटील, शिवानी मुंबाईकर, स्नेहा लखनागावकर, आशा रूपा परभणीकर आणि प्रिया काळे-नगरकर यांच्या लावणी सादरीकरणांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी महोत्सवादरम्यान कोयना नदीवरील सांगवड पूल, कै. शिवाजीराव देसाई स्मारक सभागृह आणि दौलतनगर येथील शिवाजीराव दौलत क्रिडांगण यांसारख्या विकासकामांचे उद्घाटन केले.
६ एप्रिल रोजी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली. यात ईशा मालवीय, प्रवीण तरडे, स्पृहा जोशी, प्रियदर्शन जाधव, संस्कृती बालगुडे, गिरिजा प्रभू, जान्हवी किल्लेकर, योगिता चव्हाण, भाऊ कदम, हेमांगी कवी, अरुण कदम, रसिका वेंगुर्लेकर, रोहित राऊत, जुईली जोगळेकर, कविता राम, तेजपाल वाघ, अभिजीत जाधव, अमू जाधव, पूनम कुडाळकर, अर्चना जवळेकर, नमिता पाटील आणि अस्मिता पुणेकर यांचा समावेश होता.
७ एप्रिल रोजी आयोजित संगीत संध्येला झी सारेगमपच्या कलाकारांनी बहार आणली. कार्तिकी गायकवाड, ज्ञानेश्वर मेश्राम, सन्मिता धापटे आणि अनिरुद्ध जोशी यांच्या भक्तिगीत व भावगीतांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
८ एप्रिल रोजी ‘फोक लोक’ बँड पारंपरिक लोकसंगीत आणि आधुनिक संगीताचा संगम सादर करणार आहे. ९ एप्रिल रोजी अवधूत गुप्ते यांच्या लाइव्ह परफॉर्मन्सने महोत्सवाची सांगता होणार आहे. या यशस्वी आयोजनामुळे सातारा जिल्हा सांस्कृतिक, ग्रामीण, कृषी आणि साहसी पर्यटनाचे उदयोन्मुख केंद्र म्हणून उद्यास येत आहे.
“कोयना दौलत डोंगरी महोत्सवासारखे उपक्रम महाराष्ट्रातील पर्यटन पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. सांस्कृतिक वारसा आणि नव्या पर्यटन संधी यांचा उत्तम संगम या महोत्सवात दिसतो. पाटणसारख्या कमी परिचित स्थळांना प्रोत्साहन देतानाच महाराष्ट्राला व्यापक आकर्षण असलेले पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळवून देण्यात असे उपक्रम उपयुक्त ठरतात.”
Satara News : धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे आंदोलन स्थगित; सिंचन विभागाचे आश्वासन
“कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या यशातून महाराष्ट्रात ग्रामीण, सांस्कृतिक आणि साहसी पर्यटनाची वाढती लोकप्रियता स्पष्ट होते. अशा उपक्रमांमुळे स्थानिक प्रतिभेला वाव मिळतो आणि शाश्वत आर्थिक विकासाच्या संधी निर्माण होतात. भविष्यातही अशाच उपक्रमांचा विस्तार करून महाराष्ट्राला विविध अनुभव देणारे पर्यटनस्थळ म्हणून अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागची ३१ मे २००६ रोजी स्थापना झाली. राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आणि पर्यटन क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने या विभागाची स्थापना करण्यात आली. पर्यटन आणि संस्कृती यांची नाळ एकमेकांशी घट्ट जोडलेली आहे. कारण ऐतिहासिक स्मारके, लोककला आणि स्थानिक परंपरा या केवळ सांस्कृतिक ठेवा नसून पर्यटन आकर्षण म्हणूनही ओळखल्या जातात. हेच लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आणि या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ स्तरावरील विभाग स्थापन केला.
सदर विभाग महाराष्ट्रातील अद्वितीय कला प्रकार, परंपरा आणि ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी, त्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्यासाठी कार्य करतो. तसेच, सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवून, पर्यटन विकासाला चालना देऊन हा विभाग राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीमध्ये महत्त्वाचे योगदान देत आहे. सदर विभागाच्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र राज्य केवळ एक पर्यटन स्थळ म्हणूनच नव्हे, तर एक जिवंत संस्कृती आणि वारसा असलेले राज्य म्हणून अधिक समृद्ध आणि आकर्षक बनत आहे.