लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच, २१०० रुपयांचा पत्ताच नाही; 'गेमचेंजर' योजनेवर प्रश्नचिन्ह
अमरावती जिल्ह्यात या योजनेसाठी सुमारे ७ लाख २० हजार ६०३ महिलांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सुमारे ६ लाख ९८ हजार ५३६ महिला पात्र ठरल्या आहेत. मात्र, नव्याने सुरू करण्यात आलेल्या पडताळणी प्रक्रियेत २२ हजारांहून अधिक महिलांचे अर्ज विविध कारणांमुळे अपात्र ठरविण्यात आले आहेत. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न जास्त आहे किंवा ज्यांना नोकरी लागली आहे. अशा महिलांचे अर्ज मोठ्या प्रमाणात रद्द करण्यात आले आहेत. तसेच नव्या निकषांमध्ये न बसल्याने ४४ महिलांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतली आहे. सरकारकडून निकषांमध्ये होत असलेल्या बदलांमुळे आणि २१०० रुपयांच्या आश्वासनाची अंमलबजावणी अद्याप न झाल्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलेच्या कुटुंबातील कुणाकडेही चारचाकी वाहन नसावे अशी अट आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यात ५९४२ महिलांच्या कुटुंबाकडे चारचाकी वाहन असल्याचे पडताळणीत आढळून आले आहे. याबाबतची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठविण्यात आली आहे. तसेच कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे २२ हजार ६७ महिलांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.
मतांच्या बदल्यात मिळालेले आश्वासन हवेत विरले आहे. २१०० रुपये तर मिळाले नाहीतच, पण १५०० रुपयाचाही नियमितपणा नाही. त्थातच नवनवीन नियम लावून अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे, अशी प्रतिक्रिया अमरावती राजापेठ भारती धुळेकर यांनी दिली.
१५०० रुपये मिळतात हे चांगले रक्कम लगेच संपते. थोडी बचत करता यावी यासाठी रक्कम वाढविणे गरजेचे आहे,असं अमरावती रविनगर अश्विनी हटकर यांनी म्हटलं आहे.
खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवा म्हणून निकष कडक केले जात आहेत, मात्र त्यामुळे काही पात्र महिलांचेही अर्ज अपात्र ठरण्याचा धोका आहे, अशी प्रतिक्रिया अमरावती राजपेत प्रीती काबरे यांनी दिली.
भिवंडीत अनधिकृत शाळांचा सुळसुळाट! 21 शाळांवर कारवाईचा इशारा, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर संकट






