
क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक, लातूर-लामजना महामार्गावर तीव्र आंदोलन; नेमकं मागण्या काय?
लातूर : पावसाची दडी, शेतीमालाला मिळत नसलेला भाव, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाच्या ओझ्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या संतापाचा अखेर महामार्गावर उद्रेक झाला आहे. लामजना येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.
कर्जाची वेळेवर परतफेड करूनही नियमित कर्जदार शेतकरी मदतीपासून वंचित का, असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रत्येक शेतकऱ्याला ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच गतवर्षी अतिवृष्टीच्या काळात जाहीर करण्यात आलेली १७ हजार ५०० रुपयांची मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणीही करण्यात आली. एक रुपयात चार ट्रिगरची पीकविमा योजना पूर्ववत करून पीकविम्याचा लाभ सुलभ पद्धतीने मिळावा, अशी मागणी संघटनेने केली. तसेच निवडणुकीपूर्वी सातबारा कोरा करण्याचे दिलेले आश्वासन सरकारने पूर्ण करावे, अशी मागणी करत सरकारच्या कथनी आणि करणीमध्ये तफावत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान, मागण्या तातडीने मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
शेतकरी हक्कांसाठी लढा
शेतकरी प्रामाणिकपणे कर्जफेड करतो आणि संकटातही शेती उभी करतो; मग शासनाच्या मदतीच्या वेळी त्याच्यावर अन्याय का? नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळालेच पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. मागण्या मान्य न झाल्यास लामजना येथून सुरू झालेला हा संघर्ष राज्यभर नेऊन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीची रस्त्यावरची लढाई अधिक तीव्र करू,” असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे यांनी दिला.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेने सरकारला धरले धारेवर
“सरकारने शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये; अन्यथा मंत्री आणि आमदारांना गावखेड्यात फिरणेही मुश्किल होईल,” असा थेट इशारा आंदोलकांनी दिला. आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजीव कसबे, कोअर कमिटी सदस्य राजेंद्र मोरे, कार्याध्यक्ष सत्तार पटेल, जिल्हाध्यक्ष अरुण कुलकर्णी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, विविध गावांतील सरपंच, चेअरमन, जिल्हा परिषद सदस्य आणि हजारो शेतकरी सहभागी झाले होते.