संग्रहित फोटो
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (PMRDA) महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन-३ ची वाट पाहणाऱ्या पुणेकरांची, विशेषतः आयटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आणखी लांबली आहे. पहिल्या टप्प्यातील १२ स्थानकांचे काम पूर्ण झाले असले तरी, औपचारिक उद्घाटनाची तारीख ठरलेली नाही. दरम्यान, उर्वरित चार स्थानकांच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यामुळे आता १२ ऐवजी थेट १६ स्थानके एकाच वेळी प्रवाशांसाठी खुली होण्याची चिन्हे आहेत.
सुरक्षा मंजुरी आणि कामाची स्थिती
पहिल्या टप्प्यातील माण ते बालेवाडी (आर. के. लक्ष्मण म्युझियम) दरम्यानच्या १३ किलोमीटर मार्गाला आणि १२ स्थानकांना २३ जुलै रोजीच मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची (CMRS) तात्पुरती मंजुरी मिळाली आहे. या टप्प्यातील सुमारे ९६.५ टक्के काम पूर्ण झाले असून जिने व अन्य किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत.
दुसऱ्या बाजूला, सकाळनगर, विद्यापीठ, आरबीआय आणि जिल्हा न्यायालय या उर्वरित चार स्थानकांच्या सीएमआरएस मंजुरीसाठी आवश्यक ती कागदपत्रे व डेटा अपलोड करण्याचे काम वेगाने सुरू आहे. तपासणीनंतर या स्थानकांना मंजुरी मिळताच ती पहिल्या टप्प्याशी जोडली जातील. प्रत्यक्ष उद्घाटन होईपर्यंत सर्व १६ स्थानकांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता पीएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राजकीय घडामोडी आणि उद्घाटनाचा मुहूर्त
मेट्रोच्या उद्घाटनाच्या संदर्भात पीएमआरडीए ने मुख्यमंत्री कार्यालयाकडे आधीच पत्रव्यवहार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ ऑगस्ट रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मेट्रो उद्घाटनाचे औपचारिक निमंत्रण दिले आहे. यातच शरद पवार यांनीही पंतप्रधान मोदींना बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याने, दोन्ही दौऱ्यांचा मेळ घालून या मेट्रोच्या उद्घाटनाचा मुहूर्त निश्चित केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आयटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप
दुसरीकडे, अवघ्या औपचारिक सोहळ्यासाठी पूर्ण झालेली मेट्रो सेवा रोखून धरल्याने हिंजवडी आणि बालेवाडी परिसरातील नागरिक व आयटी कर्मचाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दररोजच्या भीषण वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पहिला टप्पा तातडीने सुरू करावा, अशी जोरदार मागणी विरोधी पक्ष आणि आयटी फोरमकडून केली जात आहे.






