Local Train : कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali local train) परिसरात तुफान पाऊस कोसळतोय. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलंय. त्यातच आता लोकलसेवाही ठप्प (Local train stopped) झाल्याने संध्याकाळी ऑफिसवरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. पावसामुळे कल्याण रेल्वे स्थानकात पॉईंट फेल (Point fail at Kalyan station ) झालाय. त्यामुळे कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी आणि कसाऱ्याहून कल्याणकडे येणारी लोकलसेवा अनिश्चित काळासाठी ठप्प झालेली आहे. गेल्या दीड तासापासून कल्याण-ठाणे आणि ठाणे ते कल्याण एकही लोकल धावलेली नाही. सीएसएमटीहून ठाण्यापर्यंत लोकलसेवा सुरू असल्याचं रेल्वे प्रशानासचं म्हणणं आहे. मात्र, अद्याप प्रवाशांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कल्याण स्टेशनवर तोबा गर्दी पाहायाला मिळत आहे.
पावसामुळे लोकलसेवा पूर्णत: कोलमडली आहे. त्याचा फटका संध्याकाळी ऑफिसवरून परतणाऱ्या चाकरमान्यांना बसणार आहे. दादर स्टेशनवरही प्रवशांची गर्दी आहे. सकाळपासून कोसणाऱ्या पावसामुळे कल्याण-बदलापूर आणि बदलापूर ते कल्याण लोकलसेवा ठप्प झालेली आहेच. बदलापूर रेल्वे स्थानकात रेल्वे रुळावर पाणी आल्यानं बदलापूर-अंबरनाथ दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. त्यातच आता सीएसएमटीहून कल्याण,कसारा आणि कर्जतला जाणारी लोकलसेवाही ठप्प झाल्याने त्याचा फटका चाकरमान्यांना बसणार आहे.
तसेच पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली, वसई, विरार आणि नालासोपारा येथे पाऊस जोरदार बॅटिंग करत आहे. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळं याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे.