संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातील एका ६८ वर्षीय ज्येष्ठ असलेल्या वकिलांना सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगमधील जादा परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने तब्बल १४ कोटी २५ लाख ६५ हजार ९६५ रुपयांना गंडा घातला आहे. पुणे शहरात सातत्याने या घटना घडत असल्याचेही दिसत आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ६८ वर्षीय नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व विविध बँक खातेधारक यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे वकिल आहेत. दरम्यान, त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी संपर्क साधला होता. त्यांना शेअर ट्रेडिंगची माहिती दिली. त्यानंतर त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील केले. त्यातून तक्रारदारांना इतर व्यक्तींना होत असलेला फायदा दाखविण्यात आला. त्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. तक्रारदारांनी ते ॲप डाऊनलोड केले. नंतर त्यांना या ॲपच्या माध्यमातून वेगवेगळ्या बँक खातेवर पैसे भरण्यास सांगितले. तक्रारदारांनी थोडे-थोडे पैसे भरण्यास सुरूवात केली. तेव्हा त्यांना ॲपमध्ये त्यांचा पोर्टफोलिओ मोठ्या प्रमाणात दिसू लागला.
त्यांना सायबर चोरट्यांनी दाम दुप्पट करून देण्याची बतावणी केली. त्यानूसार, तक्रारदारांकडून चोरट्यांनी तब्बल १४ कोटी २५ लाख ६५ हजार रुपये उकळले. त्यानंतर त्यांनी ॲपमधून पैसे काढून घेण्याचे प्रयत्न केले. पण, ते होत नव्हते. त्यांनी सायबर चोरट्यांशी पुन्हा संपर्क साधला. विचारणा केली. तेव्हा त्यांना वेगवेगळ्या कारणांसाठी आणखी पैसे भरण्यास सांगण्यात आले. तेव्हा त्यांना फसवणूक होत असल्याचे ल७ात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. अधिक तपास पोलिस करत आहेत.
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तिघांची फसवणूक
सायबर चोरट्यांनी पुणे शहरातील तीन व्यक्तींना शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तब्बल ५७ लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरूद्ध गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेअर ट्रेडिंगच्या गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूकीच्या घटना पुन्हा वाढल्याचे दिसत आहे.






