रायगड : संपूर्ण जगात ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. मात्र खालापूर तालुक्यातील करबेली ठाकूरवाडी येथील आदिवासी आपले पशुधन कसे वाचेल या चिंतेत पडले आहेत. गेल्या वर्षी संपूर्ण राज्यात “लंपी” या जनावरांच्या रोगाने थैमान घातले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे पशू संवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांनी युद्ध पातळीवर उपाय योजना करून राज्यात लंपी प्रतिरोधक लसीकरण करून घेतले याचा बंदोबस्त केला होता.
परंतु याच लंपी रोगाने करंबेली ठाकूरवाडी येथे आज पुन्हा थैमान घातले आहे. ठाकूरवाडी येथे जवळपास ८० ते ९० कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील आदिवासी समाजाची उपजीविका या पशूधनावर आधारित आहे. जवळपास ३०० ते ४०० पशुधन सद्यस्थितीत ठाकूरवाडी येथे आहे. परंतु आजतागायत जवळपास ७० ते ८० जनावरांना या लंपी रोगाची लागण झाली आहे. जवळच असणाऱ्या खडई धनगरवाडा येथे सुध्दा या रोगांनी अनेक जनावरे ग्रासलेली आहेत. आजच संतोष घाटे यांचा ४ वर्षाचा खोंड या रोगामुळे मरण पावला आहे.
या बाबत माडे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना संबधित विभागाशी संपर्क केला आहे आणि यासंदर्भात “आम्हाला कोणी सांगितले नाही. तसेच आम्ही खाजगी माणूस पाठवतो. त्यांच्याकडून लसीकरण करून घ्या आणि त्यांना लसीकरणचे पैसे द्या” असे सांगितले जाते. खरंतर खाजगी डॉक्टर यांच्याकडून लसीकरण करून घ्यायचे तर मग प्रशासकीय यंत्रणा कशासाठी आहे? असा प्रश्न गरीब आदिवासी बांधव यांना पडला आहे. आतापर्यत ७० ते ८० जनावरांना या लंपी रोगाची लागण झाली तरीही प्रशासन या घटनेकडे दुर्लक्ष करत आहे.