पुणे : शिक्षण महर्षी एम.डी. शेवाळेंचे शैक्षणिक कार्य बहुजन समाजासाठी आदर्शवत असून त्यांचे हे कार्य समाजाला कायम प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. शिक्षण महर्षी एम. डी. शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी १८५२ साली स्थापन केलेल्या शाळेचे रूपांतर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ग्रंथालयामध्ये करण्यात आले. त्याचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.
त्यावेळी आमदार सुनील कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे, नगरसेवक अविनाश बागवे, माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, डी. सी.एम. सोसायटीचे अध्यक्ष डी. टी. रजपूत, सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
आठवले भाषणात पुढे म्हणाले, १८५२ साली येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी अस्पृश्यासाठी येथे पहिली शाळा सुरू केली होती. या शाळेत लहुजी वस्ताद यांनी अस्पृश्य समाजातील मुक्ता साळवे हिला या शाळेत टाकले होते. बहुजन समाजाला सुशिक्षित करायचे असेल तर प्रथम महिला शिक्षित झाल्या पाहिजे. हे दूरदृष्टीने ओळखून महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी या ठिकाणी १८५२ साली येथे शाळा सुरू केली होती. याच शाळेचे रूपांतर आता ग्रंथालयामध्ये करण्यात आलेले आहे. पुढे याच ठिकाणी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया या ( डी.सी.एम.) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेची धुरा शिक्षण महर्षी एम. डी. शेवाळे यांनी समर्थपणे पेलून शिक्षणाची ज्ञानगंगा गरीब, दलित, पीडित, शोषित समाजापर्यंत पोहोचवली. शेवाळे सरांचे अधुरे कार्य पुरे करण्यासाठी डी. सी. एम. सोसायटीच्या पाठीमागे समर्थपणे उभा राहून त्यांना कायम सहकार्य करत राहीन, असे आश्वासन आठवले यांनी दिले.
आमदार सुनील कांबळे यांनी एम. डी. शेवाळे यांचा गौरव करताना म्हणाले, डी. सी. एम. सोसायटीच्या माध्यमातून शेवाळी यांनी शिक्षणाचे खूप मोठे कार्य केलेले आहे. यापुढील काळातही सोसायटीने उच्च व्यावसायिक शिक्षण सुरू करून हे कार्य आधुनिक पद्धतीने सुरू ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपण या शाळेचे माजी विद्यार्थी असल्याचे सांगून संस्थेला पुढील काळात जी मदत लागेल ती आपण निश्चितपणे करू असे आश्वासन दिले.
[read_also content=”हंगामपूर्वीच दौंड शुगर एफआरपी पूर्ण करणार; वीरधवल जगदाळे यांची माहिती https://www.navarashtra.com/maharashtra/daund-sugar-to-complete-frp-before-season-information-of-virdhawal-jagdale-nrdm-329598.html”]
जाहीर सभेच्या प्रारंभी सोसायटीच्या कार्यालयातील शेवाळे यांच्या फोटोला रामदास आठवले यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले. नंतर शेवाळे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर महात्मा फुले यांनी १८५२ साली सुरू केलेल्या शाळेच्या वास्तूचे रूपांतर ग्रंथालयात केले. त्याचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.