
माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर
या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केले. यावेळी बोलताना करचे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत म्हटले की, “देशात चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, स्टॅम्प घोटाळा झाले; त्याचप्रमाणे माण-खटावमध्ये आता पाणी घोटाळा झाला आहे. काही भागांना दोन-दोन आवर्तने दिली जातात, मात्र माण तालुक्याच्या पूर्व भागाला एकही आवर्तन दिले जात नाही. हा सरळ सरळ अन्याय आणि दुजाभाव आहे.”
त्यांनी पुढे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ चा उल्लेख करत सवाल उपस्थित केला की, “कायद्यासमोर सर्व समान असताना आमच्यावर अन्याय का? आम्हाला आमच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित का ठेवले जाते?” करचे यांनी माणच्या उत्तर भागातील ‘जिहे-कटापूर’ योजनेचाही मुद्दा उपस्थित केला. “जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या काळात त्या भागाला पाणी सोडण्यात आले; मात्र निवडणूक संपताच पाणी बंद झाले. आज त्या भागात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला असून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मग जिहे-कटापूरचे पाणी का सोडले जात नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच माणच्या पूर्व भागाला तारळी योजनेचे पाणी देताना मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याचा आरोप करत, “वारंवार तक्रारी करूनही अधिकारी कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे या पाणी चोरीला कोणाचे संरक्षण आहे?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
१ )पाणी घोटाळा करणाऱ्या व पाणी चोरीला संरक्षण देणाऱ्या संबंधित पाटबंधारे अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
२ ) माण-खटाव तालुक्यात शासनाच्या नियमानुसार समन्यायी पाणी वाटप तातडीने सुरू करावे.
३ )शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी.
४ )नुकसानभरपाई संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करावी.अशा प्रमुख मागण्या या आंदोलनकर्त्यांनी करीत या आंदोलनानंतर अनेक शेतकऱ्यांनी रक्तदान करून प्रशासनाचे लक्ष वेधले. रक्तदानावेळी बोलताना महेश करचे म्हणाले, “शेतकऱ्यांची पोरं देशाच्या सीमेवर रक्त सांडत आहेत आणि शेतकरी उन्हातान्हात घाम गाळून देश जगवत आहे. भले आमचे रक्त घ्या, पण आम्हाला आमच्या हक्काचं पाणी द्या.”
“पाणी घोटाळा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही,” असा इशारा देत त्यांनी पुढे सांगितले की, “प्रसंगी न्यायालयाची पायरी चढू आणि तिथेही न्याय मिळाला नाही तर हा लढा आणखी उग्र करू. शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा भल्या-भल्या सत्ता कोसळतात, हा इतिहास आहे.”
मोर्चामध्ये महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. तीव्र उष्णतेतही महिला आणि शेतकरी मोठ्या निर्धाराने तहसील कार्यालयावर धडकले. या आंदोलनामुळे माण-खटाव तालुक्यातील पाणी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.