Pratap Sarnaik (Photo Credit- X)
त्यांनी सांगितले की, सन २०१७-१८ मध्ये भाजपची सत्ता असताना महानगरपालिकेच्या जागेवर अत्याधुनिक मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव आणण्यात आला होता. त्या प्रस्तावातील सर्वात मोठा “अडथळा” म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. “त्या काळात पुतळा शहराच्या मध्यभागातून हटवून गावाबाहेरील चौकात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता, जेणेकरून पुतळ्याच्या दोन्ही बाजूंना महानगरपालिकेच्या भूखंडावर मोठे मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारता येतील. हे कोणासाठी आणि कोणाच्या फायद्यासाठी केले जात होते, हे संपूर्ण शहराला माहिती आहे,” असे सरनाईक म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, महासभेत मांडण्यात आलेला घोषवारा आणि ठराव वेगळा होता. तसेच आमदार नरेंद्र मेहता हे “पुतळ्याची दुरुस्ती करून तो पुन्हा त्याच ठिकाणी बसवला जाईल” असे सांगत असले तरी ते साफ खोटे असल्याचा सांगत, मेहतावर माझा भरोसा नसल्याचं सांगितलं आहे.
सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचा उल्लेख करत सांगितले की, दोन किलोमीटरच्या परिसरात राष्ट्रीय पुरुषांचे दुसरे स्मारक किंवा पुतळा उभारण्यास नियम आहेत. त्या काळात अनेक शिवसैनिक आणि शिवप्रेमींनी या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे तो प्रस्ताव थांबवण्यात आला आणि दुसरा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सध्या हा पुतळा आता अनधिकृत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “योगायोगाने त्या वेळी महापालिकेत त्यांची सत्ता नव्हती आणि संबंधित आमदारही सत्तेत नव्हते, त्यामुळे हा डाव यशस्वी झाला नाही. दुसऱ्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात झाले,” असेही त्यांनी नमूद केले.
व्यावसायिक वाहनचालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
मात्र त्यानंतर पुन्हा सत्ता आल्यानंतर पहिल्याच महासभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा विषय आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या भूखंडावर मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे प्रस्तावही पुढे आणण्यात आले. “पुतळ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला व्यापारी संकुले उभारून मध्यभागातील जागा मोकळी करण्याचा हा स्पष्ट प्रयत्न आहे,” असे सरनाईक म्हणाले. या प्रकरणासंदर्भातील सर्व कागदपत्रे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, दोन किलोमीटर नियमाचा शासन निर्णय (जीआर) आणि २० वर्षांनंतर अचानक स्थलांतराचा निर्णय का घेतला जात आहे याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केला. “जर हा विषय महासभेत घ्यायचाच होता, तर आधी राज्य शासनाची परवानगी घेणे आवश्यक होते. परवानगी न घेता असा विषय पत्रिकेवर आणणे म्हणजे नियमांची पायमल्ली आहे,” असा आरोपही त्यांनी केला.
एका बाजूला विकास आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचे गोड बोल सांगितले जात असताना दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरच घाव घालण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. “मीरा-भाईंदरच्या जनतेने ज्यांना भरभरून मते दिली, त्याच जनतेच्या आणि शिवप्रेमींच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम आज सुरू आहे. आज जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, तर उद्या मराठी माणसांनाही या शहरातून हटवण्याचा प्रयत्न केला जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला. व्यापारी वृत्तीच्या माध्यमातून शहराची ओळख आणि अस्मिता विकण्याचा प्रयत्न आम्ही कदापि सहन करणार नाही, असे ठामपणे सांगत त्यांनी इशारा दिला की, “जोपर्यंत हा अन्यायकारक निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन करू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडू.” याचवेळी सरनाईक यांनी स्पष्ट केले की, “शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही. पुतळ्याच्या सुशोभीकरणाची जबाबदारी घेण्यासही मी तयार आहे.”






