
Maharashtra Breaking News Updates Today:
28 Apr 2026 09:59 AM (IST)
Indonesia Train Accident News in Marathi : जकार्ता : इंडोनेशियात एक भयानक ट्रेन दुर्घटना (Train Accident) घडली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे दोन ट्रेनची जोरदार धडक झाली आहे. या अपघाताने संपूर्ण इंडोनेशिया (Indoneisa) हादरलं आहे. या भीषण दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी आहेत. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
28 Apr 2026 09:50 AM (IST)
India Share Market Update: २७ एप्रिल रोजी भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. गेल्या ३ दिवसांपासून सुरु असलेली घसरण काल थांबली. जागतिक बाजारांमधील संमिश्र संकेतांमुळे, आज २८ एप्रिल रोजी मंगळवारी भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी नकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजिंगपेक्षा जवळपास ७४ पॉइंट्सच्या सवलतीवर, २४,०४६ च्या पातळीवर व्यवहार करत होता.
28 Apr 2026 09:40 AM (IST)
Gold Rate Today: भारतात 28 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 15,370 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,089 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,527 रुपये आहे. भारतात 28 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,40,890 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,53,700 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,15,270 रुपये आहे. भारतात 28 एप्रिल रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 259.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,59,900 रुपये आहे.
28 Apr 2026 09:30 AM (IST)
आयपीएल २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवत इतिहास रचला आहे. सोमवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सचा संघ आरसीबीच्या धारदार गोलंदाजीसमोर पत्त्यासारखा कोसळला. दिल्लीला १६.३ षटकांत सर्वबाद केवळ ७५ धावा करता आल्या.आरसीबीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर पकड मिळवली होती. जोश हेझलवूडने घातक गोलंदाजी करत दिल्लीला स्वस्तात गुंडाळण्यात मुख्य भूमिका बजावली, ज्यासाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.
28 Apr 2026 09:20 AM (IST)
आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सची विजयी घोडदौड सुरू असतानाच, मैदानाबाहेरही संघात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून, सह-मालकीण प्रीती झिंटा या यशाने भलतीच खूश आहे. या उत्साहातच युझवेंद्र चहल आणि प्रीती झिंटा यांच्यातील सोशल मीडियावरील संवाद सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
चहलची ती मिश्किल मागणी सोमवारी (२७ एप्रिल) प्रीती झिंटाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी एक 'PZChat' सत्र आयोजित केले होते. या सत्रात पंजाबचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने एक भन्नाट प्रश्न विचारला. चहलने विचारले, "मॅम, एका सामन्यात मला सलामीला (Opening) फलंदाजी करण्याची संधी मिळू शकेल का?" यावर चाहत्यांच्याही अनेक गमतीशीर कमेंट्स येऊ लागल्या.
28 Apr 2026 09:20 AM (IST)
भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते भरत कपूर यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील सायन रुग्णालयात आज दुपारी ३:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपटसृष्टीतील कलाकारांसह चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अनेक अवयव निकामी झाल्याने मृत्यू ज्येष्ठ अभिनेते अवतार गिल यांनी भावूक होत या वृत्ताला दुजोरा दिला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत कपूर गेल्या तीन दिवसांपासून आजारी होते. वाढत्या वयामुळे त्यांचे अनेक अवयव निकामी (Multi-organ failure) होऊ लागले होते, ज्याचा त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला. आज सायंकाळी ६:३० वाजता कुटुंबिय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
28 Apr 2026 09:15 AM (IST)
राज्यात वाढत्या तापमानाचा पारा आता जीवघेणा ठरत असून, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात उष्माघाताने एका कष्टकरी महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निमगाव सावा परिसरात ही घटना घडली असून, यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय? निमगाव सावा येथील गावमाळा परिसरात राहणाऱ्या रुपाली गाडगे या आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात खुरपणीचे काम करत होत्या. गेल्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात उष्णतेचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. शेतात काम करत असतानाच कडाक्याच्या उन्हामुळे त्यांना उष्माघाताचा झटका बसला आणि त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
28 Apr 2026 09:10 AM (IST)
आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषदेची निवडणूक लढवण्याची ऑफर दिली असून, यावर येत्या काही तासांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतून बाहेरच्या उमेदवारीला विरोध बच्चू कडू हे शिवसेनेचे अधिकृत सदस्य नसल्यामुळे त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यास शिवसेनेतील काही अंतर्गत नेत्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. 'बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देण्याऐवजी पक्षातील निष्ठावंतांना संधी मिळावी', अशी भूमिका या नेत्यांनी घेतली आहे. या पेचावर मार्ग काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना त्यांची प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
28 Apr 2026 09:05 AM (IST)
अमरावतीच्या परतवाडा येथील व्हिडिओ प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच, कोल्हापुरातूनही अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे या तरुणाला तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण? आरोपी शाहिद सनदे याने एका तरुणीवर अत्याचार करून त्याचा व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर केल्याचे तपासात उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीच्या मोबाइलमध्ये आणखी ८ ते ९ तरुणींचे व्हिडिओ असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणातील त्याचा साथीदार शाहरुख देसाई हा सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी १२ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या नऊ जागांपैकी भाजपच्या वाट्याला पाच जागा येणार असून, उमेदवारीसाठी पक्षात मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या कोअर कमिटीने ३० जणांची जंत्री दिल्लीला पाठवली होती, मात्र वरिष्ठ नेत्यांनी ही यादी फेटाळून ती अधिक संक्षिप्त करण्यास सांगितले होते.
पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर महाराष्ट्र भाजपने आता ३० ऐवजी १४ जणांची सुधारित यादी अंतिम करून दिल्लीला पाठवली आहे.विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या नेत्यांना या वेळी संधी नाकारली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाल्याची चर्चा आहे.