
Maharashtra Breaking News Updates Today:
02 May 2026 09:55 AM (IST)
राजस्थान हे भारतातील एक लोकप्रिय राज्य आहे. ते आपल्या सांस्कृतिक वारसा आणि समृद्ध परंपरांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. सोनेरी वाळवंट, सुंदर पर्वतरांगा आणि भव्य महालांनी भरलेले हे राज्य पर्यटकांचे नेहमीच स्वागत करते. अनेक सेलिब्रेटींचे विवाहसोहळे देखील या ठिकाणी पार पडले आहेत. अशातच आज आम्ही तुम्हाला राजस्थानमधील एका अशा ऑफबीट डेस्टीनेशनची माहिती सांगत आहोत जिथे तुम्ही पर्यटनाचा एक अद्भूत अनुभव घेऊ शकता. हे ठिकाण राजस्थानच्या पाली जिल्ह्यात वसले आहे. ते सुमेरपूर तहसीलच्या अंतर्गत येते. याचे नाव आहे सवाई. राजस्थानमधील हे ठिकाण फार कमी लोकांना ठाऊक आहे त्यामुळे इथे कोणत्याही गजबटाशिवाय पर्यटनाचा चांगला अनुभव घेता येऊ शकतो.
02 May 2026 09:45 AM (IST)
Watermelon Death Case Mumbai News Marathi: मुंबईतील बिर्याणी-कलिंगड या प्रकरणामागील नेमकं सत्य काय आहे? मुंबईतील पायधुणी परिसरातील एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू कसा झाला? बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरोखरच त्यांचा मृत्यू झाला की यामागे दुसरे काही कारण होते? आता या प्रश्नांवरून अखेर सत्य समोर आलं आहे. मुंबईत एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यूसाठी कलिंगडला जबाबदार धरण्यात आले होते. या तपासणीतून असे समोर आले होते की, कलिंगडमधून विषबाधा झाली असावी. बिर्याणीनंतर कलिंगड खाणे जीवघेणे आहे, असेही म्हटले जात होते. या प्रकरणानंतर मुंबईच्या बाजारातून कलिंगड गायब झाले. आता त्या मृत्यूंमागील गूढ उकलले असल्याचे दिसते. मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल्ला डोकाडिया यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू कलिंगड नव्हे, तर विषामुळे झाला असावा.
02 May 2026 09:31 AM (IST)
Maharashtra HSC Result 2026 News Marathi: महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२६ ची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज इयत्ता १२वीचा (HSC) निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाची घोषणा प्रथम सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत घेण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे.
02 May 2026 09:25 AM (IST)
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि निवडणूक आयोग यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मतमोजणीसाठी केवळ केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधील (PSU) कर्मचाऱ्यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला टीएमसीने आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
कलकत्ता उच्च न्यायालयाने गुरुवारी यासंदर्भातील टीएमसीची याचिका फेटाळून लावत निवडणूक आयोगाचा निर्णय वैध ठरवला होता. "मतमोजणी केंद्रावर कोणाची नियुक्ती करायची, हा सर्वस्वी निवडणूक आयोगाचा अधिकार आहे," असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. मात्र, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमुळे मतमोजणीत पक्षपातीपणा होऊ शकतो, असा दावा करत टीएमसीने सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. या प्रकरणावर शनिवारी तातडीची सुनावणी होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये ४ मे रोजी मतमोजणी होणार असून त्यापूर्वी या कायदेशीर लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
02 May 2026 09:20 AM (IST)
जयपूर: आयपीएल २०२६ मधील ४३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या हाय-स्कोअरिंग सामन्यात दिल्लीने २२६ धावांचे विशाल लक्ष्य ५ चेंडू राखून पूर्ण केले, जो दिल्लीच्या आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (६ धावा) आणि वैभव सूर्यवंशी (४ धावा) स्वस्तात बाद झाले. मात्र, कर्णधार रियान परागने ५० चेंडूंत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ९० धावांची तुफानी खेळी केली. त्याला ध्रुव जुरेल (४२ धावा) आणि शेवटच्या षटकात डोनाव्हन फरेराने (१४ चेंडूंत ४७* धावा) चांगली साथ दिल्याने राजस्थानने २२५ धावांचा डोंगर उभा केला.
02 May 2026 09:15 AM (IST)
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत गुरुवारी एक महत्त्वाची घडामोडी घडली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर १० जागांसाठी केवळ १० उमेदवारांचे अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने अतिरिक्त उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याने मतदानाची औपचारिकता टळली आहे.
या निवडणुकीसाठी महायुतीने ९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. यात भाजपने ५ नवीन चेहऱ्यांसह प्रज्ञा सातव (एकूण ६) यांना संधी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनी अर्ज दाखल केला आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झीशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. जागांइतकेच अर्ज आल्यामुळे १२ मे रोजी होणारी ही निवडणूक आता केवळ तांत्रिक प्रक्रिया उरली असून, सर्व १० उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
02 May 2026 09:10 AM (IST)
नवी दिल्ली: महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांना केंद्र सरकारने मोठा धक्का दिला आहे. १ मे पासून व्यावसायिक (Commercial) गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल ९९३ रुपयांची विक्रमी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेलमधील खानावळ आणि बाहेरचे जेवण महागणार असून, आता घरगुती गॅसच्या किमतीही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गेल्या १५ वर्षांत घरगुती गॅसच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. ताज्या माहितीनुसार, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ४० ते ५० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम या दरवाढीवर झाला आहे. सध्या दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किंमत ३,०७१.५० रुपयांवर पोहोचली आहे. घरगुती गॅसचे दर अद्याप स्थिर असले, तरी येत्या आठवड्यात त्यात वाढ होण्याचे संकेत मिळाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे. ५०० रुपयांत मिळणारा सिलेंडर आता १००० रुपयांच्या उंबरठ्यावर असल्याने सर्वसामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
02 May 2026 09:05 AM (IST)
श्रीरामपूर: अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर परिसरात १ मे रोजी रात्रीच्या सुमारास पित्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादाचे रूपांतर हिंसेत होऊन पोटच्या मुलानेच आपल्या जन्मदात्याचा चाकूने वार करून खून केला.
मुसा हसन बागवान (वय ६५) असे या दुर्दैवी मृत पित्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी रात्री ११:३० च्या सुमारास बाप-लेकामध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वादातून संतापलेल्या मुलाने वडिलांवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुसा बागवान यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.
02 May 2026 08:57 AM (IST)
Missing Link: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास अधिक सुखकर करणाऱ्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर, आता या मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. खोपोली एक्झिट ते कुसगाव दरम्यानच्या या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. सध्या मुंबईहून पुण्याकडे जाणारी मिसिंग लिंकची लेन वाहनांसाठी खुली करण्यात आली असून, या मार्गावर वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. मात्र, पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी लेन तांत्रिक कारणास्तव सध्या बंद ठेवण्यात आली आहे.
Maharashtra HSC Result 2026 News Marathi: महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२६ ची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज इयत्ता १२वीचा (HSC) निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाची घोषणा प्रथम सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत घेण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा १२वीचा निकाल गेल्या वर्षी ५ मे रोजी जाहीर झाला होता. डिजीलॉकरने काही दिवसांपूर्वीच digilocker.gov.in या आपल्या वेबसाइटवर “लवकरच येत आहे” (COMING SOON) अशी सूचना प्रसिद्ध करून निकाल लवकरच जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाच्या वेबसाईटवर काही बिघाड झाल्यास, विद्यार्थी डिजीलॉकर वेबसाईट किंवा ॲपद्वारे आपला निकाल तपासू शकतील. महाराष्ट्र बोर्डाच्या पत्रकार परिषदेत मुला-मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारीसुद्धा जाहीर केली जाईल.