महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी
Maharashtra Monsoon Update: राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह कोकण आणि घाट माथा परिसरात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ४ ते ६ जुलै या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मुंबई हवामान विभागाने मुंबईसह ठाणे जिल्ह्यासाठी ४ आणि ५ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टी, विजांचा कडकडाट, पाणी साचणे, पूरस्थिती आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या शक्यतेमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) क्षेत्रातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांना शनिवार, ४ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा निर्णय राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई आणि सीआयई या सर्व व्यवस्थापनांच्या शैक्षणिक संस्थांना लागू आहे.
दुसरीकडे पालघर जिल्ह्यातही पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली असून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
तसेच सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. संभाव्य पूरस्थिती, वाहतूक विस्कळीत होणे आणि स्थानिक पातळीवर नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सखल भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, घाट रस्त्यांवरील प्रवास टाळावा आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका: 1916
पालघर जिल्हा: 02525-297474 / +91 82379 78873
ठाणे महानगरपालिका: 022-25364779 / 022-25301740 / +91 93723 38827
ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्ष: 1800-222-108 / 8657887101
पनवेल महानगरपालिका: 022-27458040 / 41 / 42
सलग चार दिवसांच्या मुसळधार पावसानंतर शुक्रवारी मुंबईत काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे रस्ते वाहतूक सुरळीत सुरू होती. उपनगरीय लोकल सेवा ५ ते १० मिनिटे उशिराने धावत होत्या. मात्र हवामान विभागाने रेड अलर्ट कायम ठेवला असून काही ठिकाणी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
पुणे शहरात कालपासून सुरू असलेल्या पावसाने अधिक जोर धरला. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहरात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस पुणे शहरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.






