(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आईच्या ७०व्या वाढदिवशी तेजस्विनी पंडित भावूक
सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
आई वडिलांच्या निधनानंतरचा संघर्ष केला व्यक्त
Tejaswini Pandit: मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिची आई आणि मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं १६ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला होता. वयाच्या ६९व्या वर्षी ज्योती चांदेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या ज्योती चांदेकर यांनी ‘ठरलं तर मग’ या मालिकेतूनही प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
गेल्या दोन वर्षांपासून त्या स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारत होत्या. त्यांच्या निधनानंतर मालिकेतही मोठी पोकळी निर्माण झाली. आईच्या निधनाने तेजस्विनी पंडित हिलाही मोठा धक्का बसला होता. आता आईच्या ७०व्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘आई गेल्यापासून सोशल मीडियावर मोजकंच व्यक्त होता आलं…’
तेजस्विनीने आपल्या पोस्टच्या सुरुवातीलाच लिहिलं, “Random post नाहीये. आई गेल्यापासून सोशल मीडियावर मोजकंच व्यक्त होता आलं. किंबहुना, नाहीच व्यक्त होता आलं. May be this the last time I am explicitly expressing myself about my parents on this platform…”
पुढे तिने लिहिलं, “आज आईचा ७०वा वाढदिवस असता. जोरात celebrate करायचा प्लॅन होता… असो.”
आई-वडील नेहमी ‘शिकत राहिलं पाहिजे, शेवटच्या श्वासापर्यंत शिकण्याची वृत्ती पाहिजे’, असं सांगायचे, अशी आठवणही तेजस्विनीने या पोस्टमधून सांगितली.
View this post on Instagram
तेजस्विनीने आई-वडिलांच्या निधनानंतरच्या आयुष्याबद्दलही मन मोकळं केलं. ती म्हणाली, “आई-वडील बनल्यावर मूल वाढवायला कुणी शिकवत नाही, ते अपसूक येतं. दुर्दैवाने, आई-वडील गेल्यावर मुलांना एकट्याने मोठं व्हायला अपसूक येत नाही, ते शिकावं लागतं.”
पुढे ती म्हणते, “एक एक पाऊल पुढे टाकावंच लागतं. अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात. चार खोल्यांच्या घरात एकट्याने परतावं लागतं. झोप येत नसेल, थकवा आला असेल तर डोक्यावरून हात फिरवायला कुणी येणार नाही, हे गृहीत धरावं लागतं.”
आई-वडिलांच्या निधनाबद्दल बोलताना तेजस्विनीने त्यांच्या जाण्याची वेळ किती कठीण होती, हेही सांगितलं. “आमचे आई-बाबा दोघेही ‘अचानक’ गेले. अचानक या शब्दाचीच भीती वाटेल इतके अचानक. Because after losing parents at an early age, nothing feels the same, no achievement feels like one!” असं तिने लिहिलं.
“बाबांना जाऊन ११ वर्षे झाली आणि आईला जाऊन एक वर्ष,” अशी माहितीही तिने आपल्या पोस्टमधून दिली.
‘Grief eventually fade होईल, पण हा loss कधीच जात नाही’
तेजस्विनीने पुढे लिहिलं, “May be grief will eventually fade but this kind of loss never leaves.” आई-वडिलांना गमावल्यानंतर व्यक्तीच्या आत काहीतरी कायमचं बदलतं, असंही तिने म्हटलं आहे.
“तुम्ही आत्तापर्यंत होता त्याच्यापेक्षा खूप बदलून जाता. Something shifts inside of you. You carry the weight most people don’t understand,” असं ती म्हणते.
आई-वडील गेल्यानंतर आयुष्य आणि त्यातील अनुभवच आपले पालक होतात. ते चांगलं-वाईट सगळं शिकवतात, असंही तेजस्विनीने म्हटलं आहे.
आई-बाबांच्या आठवणींसोबत पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त करत तेजस्विनीने लिहिलं, “But maybe now I have to be ready. Not to move on… to move forward.”
“त्यांच्या आठवणींचं बोट धरायचं, आयुष्याच्या शाळेत पुन्हा भरती व्हायचं आणि त्यांच्या संस्कारांचं दप्तर घेऊन पुढच्या परीक्षेसाठी शिकायला बसायचं,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
शेवटी आई-बाबांना उद्देशून तेजस्विनीने लिहिलं, “So आई-बाबा… आम्ही शिकत राहू. तुमच्यासारखंच. शेवटच्या श्वासापर्यंत. Let healing and grief co-exist!”
“तुमचे संस्कारच आमची सगळ्यात मोठी कमाई आहे. तुम्ही शारीरिकदृष्ट्या दूर गेले असाल आमच्यापासून, पण तुमच्या विचारांचा वारसा इथेच आहे. आमच्यासोबत,” असं म्हणत तेजस्विनीने आई-वडिलांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या.






