बसेस, कार, बाईक टॅक्सी या वाहनांसाठी प्रताप सरनाईकांता महत्त्वपूर्ण निर्णय (फोटो सौजन्य-X)
मुंबई : राज्यातील बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी ॲप वर आधारित राज्यात व्यवसाय करताना कायदेशीर तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे. खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. विधानभवन येथे ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सीच्या विविध विषयासंदर्भातील बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आले आहे. कोणत्याही ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचे पालन करूनच वाहतूक व्यवसाय केला पाहिजे. राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करेल. ॲपवर आधारित बसेस, कार, बाईक टॅक्सी यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे अत्यंत आवश्यक आहे. अर्थात, शासनाने बनविलेले नियम हे प्रवाशांच्या हिताचे असल्यामुळे त्यांच्या हिताचे संरक्षण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नियम तोडणाऱ्यांवर शासन कडक कारवाई करणार
ॲप आधारित सेवांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक
केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन बंधनकारक
राज्यातील ॲपवर आधारित प्रवासी वाहतूक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत असताना, सरकारच्या या इशाऱ्यामुळे कंपन्यांना त्यांच्या नियमांचे पुनरावलोकन करावे लागणार आहे.
दरम्यान, बस ॲग्रीगेटरना नोटिसा बजावण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते, मात्र या कंपन्यांकडून त्यावर उत्तर मिळाले अथवा नाही हे कळू शकले नाही. परीवहनमंत्र्यांनी याबद्दल अधितकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी या कंपन्यांवर छापे टाकणे अथवा त्यांच्याकडून दंड वसूल करणे गरजेचे होते असे म्हटले आहे. असे न झाल्यास या सेवा थांबवणे गरजेचे होते असे त्यांचे म्हणणे आहे. जर बस ॲग्रीगेटर सेवा प्रवाशांसाठी फायदेशीर असतील तर त्यांच्यासाठी धोरण तयार करण्याची गरज आहे. मात्र धोरणाशिवाय ॲप-आधारित बसेस चालू देणे योग्य नसल्याचे सरनाईक यांचे म्हणणे आहे.