फोटो सौजन्य सोशल मीडिया
पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करताना टँकर, पाणीसाठे आणि उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
नंदुरबार जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८६०.४० मि.मी. आहे. मात्र यंदा आतापर्यंत केवळ ४२४.१० मि.मी., म्हणजे सरासरीच्या ४९ टक्के पाऊस झाला आहे. अक्राणी तालुक्यात ३९.७० टक्के, तळोदा तालुक्यात ४०.६० टक्के आणि नंदुरबार तालुक्यात ४१.४० टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे.
त्यामुळे अवर्षणप्रवण गावांमध्ये आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बैठकीत पर्जन्यमान, जलजीवन मिशन, शेतीची स्थिती, पीक पंचनामे, चारा आणि रोजगाराच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
उष्णतेमुळे नैसर्गिक जलस्रोत तसेच भूजल पातळी कमी होत असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा विचार करून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश मुश्रीफ यांनी दिले. गरज भासल्यास टँकरची व्यवस्था करण्याबरोबरच छोटे टँकर खरेदी करण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले.
अनधिकृत पाणी उपशावर कठोर निर्बंध घालून उपलब्ध पाणीसाठ्याचा काटेकोर वापर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा नियोजन विकास निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये जलव्यवस्थापन आणि जलसंधारणाला विशेष प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
खरीप हंगाम २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या तालुक्यांतील दुष्काळग्रस्त पिकांचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना आवश्यक मदत आणि पाण्याची उपलब्धता करून देण्यावर भर देण्यात आला. दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी पुरेसा चारा व वैरण उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देण्याचेही निर्देश आहेत.
मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी ग्रामपंचायतीनिहाय रोजगाराची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू करावीत. रोजगार हमी योजनेत जलसंधारण, जलसाठे आणि भूजल पातळी वाढविणारी कामे हाती घेऊन त्यातून अधिकाधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे मुश्रीफ यांनी सांगितले.






