Maharashtra Rain Update: Heavy rain across the state, what is the update for the holidays for schools in this district
Maharashtra Rain Update: गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अजून दोन-तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवा आहे. पावसाचा जोर पाहता राज्य सरकारकडून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत. तसेच शाळांना सुट्ट्याही जाहीर करण्यात आल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीतील रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. याशिवाय पालघर मध्येही पावसाचा जोर कायम असल्याने पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच सांगली, लोणावळा परिसरातील शाळाही आज बंद राहणार आहेत. प्रशासनाकडून सातारा जिल्ह्यातील पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड आणि सातारा या सहा तालुक्यांतील शाळांना पावसामुळे आज, बुधवार (ता. २०) आणि उद्या, गुरुवार (ता. २१) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Mumbai Rains Live: मुंबईत पुन्हा पावसाचा Red Alert, 24 तासाच 6 मृत्यू, 5 बेपत्ता; अनेक ट्रेन्स रद्द
दुसरीकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.तसेच पुणे जिल्हयात पावसाचा जोर कायम असून पुणे घाटमाथ्यावर तूफान पाऊस सुरू आहेत. पहाटेपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पुण्यात सर्व शाळा आणि महाविद्यालये सुरू राहणार आहेत.
ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी झाल्याने जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण–डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याप्रमाणे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, सरकारी तसेच खासगी, दोन दिवसांसाठी सुट्टी आहेत.
दरम्यान, हवामान खात्याने मुंबईला आज सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील तीन तासांत मुंबईसह पालघर आणि रायगड मध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे.
मुंबईत आज दुपारी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पालघर आणि नाशिकमधील घाट परिसरात विशेषतः जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. नागरिकांनी या भागात काळजी घेणे आवश्यक आहे. आज सकाळपर्यंत, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघर, रायगड, पुणे घाट, नाशिक घाट आणि चंद्रपूर या भागांमध्ये रेड अलर्ट जाहीर केला गेला आहे. तसेच, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली, धुळे, वर्धा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.