राज्यात मान्सूनचा प्रवास सुरू (फोटो- ani)
मुंबई: अठरा दिवसांच्या विश्रांतीनंतर 16 जूनपासून राज्यात मान्सूनचा प्रवास परत सुरु झाला आहे. गेल्या 24 तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडलेला आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तुलनेत पूर्व विदर्भातील काही भागातच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे, आणि उर्वरित विदर्भात हवामान प्रामुख्याने कोरडे होते.
1 ते 16 जून दरम्यान कोकण आणि गोवा उपविभागात सरासरीच्या 22 टक्के अधिक पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा एक टक्का कमी, मराठवाड्यात 26 टक्के कमी, आणि विदर्भात 61 टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील 134 तालुक्यांमध्ये एकूण पाऊस 65 मिलीमीटर हून अधिक पडला आहे आणि 84 तालुक्यांमध्ये सरासरी ते सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे. भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, हिंगोली, आणि बीड जिल्ह्यांसह खानदेशातील काही तालुक्यांमध्ये पावसाची घट लक्षणीय आहे.
22 जूनपर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात चांगल्या पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असल्याची शक्यता आहे. या भागांपेक्षा पूर्व विदर्भात पावसाचे प्रमाण थोडे अधिक राहू शकते. या सर्वच भागांमध्ये 22 तारखेपर्यंत मुसळधार किंवा अति मुसळधार पावसाची शक्यता नाही.
अद्यापि ज्या भागांमध्ये चांगला पाऊस पडलेला नाही (प्रामुख्याने विदर्भात) त्या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेसा ओलावा असल्याशिवाय पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा
पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात तेथे पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात यावी. जी पर्यटनस्थळे धोकादायक असतील तेथे मागदर्शक सूचना लावण्याबरोबरच सुरक्षा बंदोबस्त ठेवून दुरुस्ती होईपर्यंत ती पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवण्यात यावीत. त्याचबरोबर प्रशासन अथवा पोलीस यंत्रणेच्या सूचनेनंतर देखील दक्षता न घेणाऱ्या पर्यटकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, असे निर्देश मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिले.
Kundmala Accident: ‘कुंडमळा’ दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश
पुणे जिल्ह्यात कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आढावा घेतला. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.