
गोविंदांच्या उत्साहात पावसाची भर! आज महाराष्ट्रात कुठे बरसणार सरी? जाणून घ्या हवामानाचा अंदाज (फोटो सौजन्य-ChatGPT)
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नाशिक तसेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सुमारास वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर राज्याच्या उर्वरित भागांत मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी दिवसभर ढगाळ वातावरण राहू शकते. अधूनमधून ऊन-सावलीचा खेळही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. मात्र सध्या सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता कमी आहे.
हवामानातील या बदलामागे मध्य प्रदेश आणि लगतच्या परिसरातील सक्रिय कमी दाबाचे क्षेत्र महत्त्वाचे कारण मानले जात आहे. या प्रणालीशी संबंधित चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून सुमारे ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील दोन दिवस ही प्रणाली याच परिसरात राहण्याची शक्यता आहे. हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे येत्या काही दिवसांत महाराष्ट्रातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, आज राज्यभर दहीहंडी उत्सव साजरा होत असल्याने पावसाच्या सरी गोविंदांचा उत्साह आणखी वाढवू शकतात. मात्र मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असलेल्या भागांतील नागरिक आणि गोविंदा पथकांनी आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पुणे जिल्ह्यातील भातक्षेत्रात पाऊस समाधानकारक असून, पीक परिस्थिती चांगली आहे. पूर्वेकडील विशेषतः इंदापूर, बारामती, दौंड, शिरूर तालुक्यात ऑगस्टमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस आहे. या भागातील मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन इत्यादी पिकांना पावसाचा ताण जाणवत आहे. चांगला पाऊस न झाल्यास खरीप पिकांच्या उत्पादकतेत घट येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Washim News: ४ दिवसाच्या पावसाने जलसाठ्यात झाली वाढ; एकबुर्जीचा जलसाठा पोहोचला ३६.४१ टक्क्यांवर