एलपीजीचे ११ हजार टन उत्पादन वाढले
मुंबई : देशात एलपीजी आणि पीएनजीचा मुबलक साठा उपलब्ध आहे. एलपीजीचे उत्पादन 11 हजार मेट्रीक टनांपर्यंत वाढवले आहे. त्यामुळे नागरिकांनी पॅनिक होऊन रांगा लावण्याची किंवा घाबरून जाण्याची गरज नाही, असे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले. तसेच, गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात सरकारने आक्रमक पवित्रा घेतला असून, आतापर्यंत ३३ गुन्हे दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी विधान परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. भुजबळ म्हणाले, गॅसपुरवठा हा केंद्राचा विषय आहे. त्यांच्याकडे मुबलक एलपीजी असल्याचे केंद्राने सांगितले आहे. त्यामुळे एलपीजी आणि पीएनजीचा तुटवडा भासणार नाही. त्यामुळे काळजी करायचे कारण नाही. गॅसचा साठा दडवून ठेवणे किंवा काळाबाजार करणे रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली विशेष समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईचा तपशील भुजबळ यांनी सभागृहात मांडला.
छगन भुजबळ यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेल्या बदलाविषयीदेखील माहिती दिली. ते म्हणाले, सिलिंडरच्या किमती मागील महिन्यात ८५२.५० रुपये होत्या. आता त्या ९१२.५० रुपये झाल्या आहेत. व्यावसायिक सिलिंडर १७२०.५० रुपये होत्या, तर आता त्याच किमती १८३५ रुपये झालेल्या आहेत. घरगुती सिलिंडरला भारत सरकारतर्फे आपल्याला ३०० रुपये मिळतात.
हेदेखील वाचा : Indian Currency : Iran युद्धाची रुपयाला झळ, Dollar समोर भारतीय चलन का पडतंय कमकुवत?
केरोसीन उपलब्ध करुन देऊ
राज्यात केरोसीन पुन्हा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. आपल्याकडे केरोसीनचा साठा आहे. पण, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एक निर्णय दिला होता की, उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ लोकांनी घेतल्यामुळे केरोसीन देऊ नका. मात्र, सध्या उद्भवलेली परिस्थिती पाहता केरोसीन आता उपलब्ध करुन द्यावे लागेल, असे भुजबळ म्हणाले.
जहाज गुजरातच्या बंदरात
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून भारतावर ओढवलेले एलपीजी संकट आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’ (Strait of Hormuz) हा सागरी मार्ग बंद केल्यामुळे भारतीय जहाजे तिथे अडकून पडली होती. मात्र, भारताच्या यशस्वी राजनैतिक प्रयत्नांनंतर, 54 हजार टन एलपीजी घेऊन ‘शिवालिक’ हे जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात सुखरूप दाखल झाले आहे. यामुळे देशातील गॅस टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.






