Photo Credit- Team Navrashtra
Marathi Breaking news live updates : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतांच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक वर्षांपासून केवळ चर्चेपुरती मर्यादित असलेली ही शक्यता यावेळी मात्र प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हं दिसत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे यांच्या मनसेने आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (ठाकरे गट) पुन्हा हातमिळवणी केल्यास राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
21 Apr 2025 03:11 PM (IST)
राज्यात एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेला उधाण आलं असतानाच आता दोन्ही राष्ट्रवादीही एकत्र यावी अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील तशी इच्छा व्यक्त केली आहे. यादरम्यान आमदार रोहित पाटील यांनी देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.
21 Apr 2025 02:15 PM (IST)
ख्रिस्ती धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचं वयाच्या ८८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं आहे. वॅटिकन सिटीमध्ये त्यांचे निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. निमोनिया झाल्यामुळे काही दिवसांपूर्वी पोप फ्रान्सिस यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
21 Apr 2025 11:26 AM (IST)
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी बोस्टनमध्ये भारतीय प्रवासी नागरिकांना संबोधित केले. या भाषणात त्यांनी भारतातील निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी असा आरोप केला की भारतातील निवडणूक आयोगासोबत "तडजोड" झालेली आहे आणि व्यवस्थेत कुठेतरी काहीतरी गडबड आहे.
राहुल गांधी यांनी यावेळी महाराष्ट्रातील मतदानाबाबत एक धक्कादायक दावा करत सांगितले की, तिथे एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक लोकांनी मतदान केल्याचे आकडे दर्शवले गेले. त्यांच्या मते, संध्याकाळी ५.३० वाजता निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार ठराविक संख्येने मतदान झाले होते, मात्र त्यानंतर अवघ्या दोन तासांत म्हणजे ७.३० वाजेपर्यंत ६५ लाख मतदारांनी मतदान केल्याचा दावा करण्यात आला – जे त्यांच्या मते अशक्य आहे आणि त्यामुळेच ही प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात आहे.
21 Apr 2025 11:03 AM (IST)
भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर मतदारसंघातील भाजपचे स्थानिक व निष्ठावंत कार्यकर्ते असंतोष व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे. कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे.
21 Apr 2025 10:57 AM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. दोघांच्या भेटीचे कारण पुण्यातील साखर संकुलात होणारी तांत्रिक विषयावरील बैठक हे ठरले आहे. ही बैठक आज (सोमवारी) सकाळी 11 वाजता पार पडणार असून, शरद पवार आणि अजित पवार दोघांचाही या बैठकीस उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
21 Apr 2025 10:47 AM (IST)
राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) ज्युनियर राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रमेश नागपुरी यांना डोपिंगमध्ये सहभागी असल्याबद्दल निलंबित केले आहे. तर सात खेळाडूंनाही डोपिंग चाचण्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रीय अॅथलेटिक्ससाठी हा मोठा धक्का आहे. कारण याशिवाय इतर दोन प्रशिक्षक करमवीर सिंग आणि राकेश यांनाही डोपिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये निलंबित करण्यात आले आहे.
21 Apr 2025 10:47 AM (IST)
पृथ्वीभोवती तब्बल ३,५२० प्रदक्षिणा घालून, २२७ दिवसांचे अंतराळातील अभियान पूर्ण करत रशियन आणि अमेरिकन अंतराळवीरांचे ‘सोयुझ’ यान रविवारी (२० एप्रिल) सकाळी ६:२० वाजता कझाकस्तानच्या झेझकाझगान परिसरात सुरक्षितपणे उतरले. या मोहिमेत सहभागी असलेले रशियन अंतराळवीर अलेक्सी ओव्हचिनिन, इव्हान वॅग्नर आणि अमेरिकन अंतराळवीर डॉन पेटिट हे तिघेही सुखरूप आणि उत्तम आरोग्यासह पृथ्वीवर परतले
21 Apr 2025 10:40 AM (IST)
तीव्र उतारावर नियंत्रण सुटलेल्या भरधाव ट्रकने एकामागून एक पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत कारमधील बाप-लेकीचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाट रविवारी रात्री उशिरा घडली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ट्रक मुंबईच्या दिशेने जात असताना खंडाळा घाटातील उतारावर ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकने समोरून येणाऱ्या पाच वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत एका कारमधील सुमारे ४५ वर्षीय पुरुष व त्यांची १३ वर्षांची मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला.