Maharashtra Breaking News
Marathi Breaking news live updates : आषाढी वारीनिमित्त दरवर्षी लाखो वारकरी आणि भाविक पायी चालत किंवा विविध वाहतुकीच्या साधनांनी पंढरपूरला लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. यंदाही अनेक भाविक पायी दिंडीतून पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत, तर उर्वरित भाविक रेल्वे आणि एसटीद्वारे प्रवास करत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातून एसटी महामंडळाने यासाठी विशेष नियोजन केले असून, सध्या पर्यंत २३ एसटी बसगाड्यांचे आरक्षण झाले आहे. येत्या ३ जुलै रोजी रत्नागिरीसह विविध आगारांमधून या बसगाड्या पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.अजून काही दिवसांचा अवधी असल्याने इच्छुक भाविकांनी लवकरात लवकर आपले आरक्षण करून घ्यावे, असे आवाहन एसटी विभागातर्फे करण्यात आले आहे.
02 Jul 2025 07:05 PM (IST)
भारतीय नौसेना अग्निवीर एमआर म्युझिशियन भरती 2025 ही संगीतामध्ये प्रावीण्य असलेल्या आणि देशसेवेच्या इच्छेने प्रेरित असलेल्या तरुण-तरुणींना दिली जाणारी एक अत्यंत खास संधी आहे. भारतीय नौसेनेने संगीत विभागासाठी अग्निवीर पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 5 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2025 असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.joinindiannavy.gov.in यावर अर्ज सादर करावा.
02 Jul 2025 06:03 PM (IST)
दौंड: सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत केली आहे. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, या प्रगतीमुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर वाढले असून, नागरिकांना मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांची विधानसभेत केली आहे.
02 Jul 2025 05:48 PM (IST)
पुणे: पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जून महिन्यात एकट्या महिन्यात तब्बल ५२ लाख ५७ हजार प्रवाशांनी मेट्रोचा वापर केला आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक मासिक प्रवासी संख्या असून, मेट्रोने एका महिन्यातच ५० लाख प्रवाशांचा टप्पा ओलांडला आहे.
02 Jul 2025 04:48 PM (IST)
मुंबई: राज्यात सध्या मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. तर राज्याच्या राजकारणात सध्या दुसरी चर्चा सुरू आहे ती म्हणजे ठाकरे बंधु एकत्र येणार की नाही? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. दोन्ही पक्ष 5 जुलै राजी मराठी भाषेसाठी एकत्र येणार आहेत. दरम्यान या सर्व विषयावर खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
02 Jul 2025 04:38 PM (IST)
लोकप्रिय कोरियन अभिनेत्री ली सेओ यी यांच्या निधनाची वाईट बातमी समोर आली आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. आता त्यांच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्री आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत कोणालाही माहिती नव्हते की अभिनेत्री ली सेओ यी या जगात नाहीत. आता त्यांच्या मॅनेजरने या बातमीला दुजोरा दिला आहे. तसेच, अभिनेत्री ली सेओ यी यांनी शेवटचा श्वास कधी घेतला हे उघड झाले आहे? या बातमीने इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे.
02 Jul 2025 04:26 PM (IST)
बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील गुंडगिरीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगाची हवा खात आहे. मात्र वाल्मिक कराडचे अनेक कारनामे आता समोर येत आहेत. वाल्मिक कराड हा अनेक दिवस फरार देखील होता. यापूर्वी त्याने बीडमध्ये दहशत पसरवण्यासाठी अनेक गुन्हे केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. वाल्मिक कराडसोबत यापूर्वी काम करत असलेल्या त्याचा सहकारी विजयसिंह बांगर यांनी अनेक गंभीर दावे आणि आरोप केले आहेत. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व पुरावे देणार असल्याचे देखील बांगर म्हणाले आहेत.
02 Jul 2025 04:22 PM (IST)
भारतातील रंग उद्योगातून एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं तर, आदित्य बिर्ला ग्रुपची कंपनी ग्रासिम इंडस्ट्रीजने सीसीआय म्हणजेच भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये देशातील सर्वात मोठी रंग कंपनी एशियन पेंट्सवर मोठा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर बुधवारी एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. ज्यामुळे शेअर्समध्ये २% ची घसरण झाली.
02 Jul 2025 04:18 PM (IST)
एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांनी संभाजीनगर मधील मोठा घोटाळ उघड कऱणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संभाजीनगर महापालिकेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रमाई घरकूल योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत नव्या बॉम्बची वात पेटवली आहे.
02 Jul 2025 04:11 PM (IST)
अभिनेता निलेश साबळे ‘चला हवा येऊ द्या’ या शोच्या माध्यमातून एक्झिट घेणार असून त्याच्या ऐवजी सुप्रसिद्ध टिव्ही अभिनेता येणार आहे. काल अनेक माध्यमांनी यासंदर्भात बातमी देखील दिली होती. निलेशच्या जागी अभिजीत खांडकेकर दिसणार असल्याचं शिक्कामोर्तब झालंय. निलेश ‘चला हवा येऊ द्या’ शो सोडणार म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक मंडळी आपली प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. निलेश ‘चला हवा येऊ द्या’ शो सोडणार असल्याच्या बातमीवर ज्योतिष अभ्यासक शरद उपाध्याय यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट शेअर केलेली आहे.
राशीचक्रकार शरद उपाध्येयांनी निलेश साबळेबद्दल लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. काही वर्षांपूर्वी राशीचक्रकार शरद उपाध्ये यांना ‘चला हवा येऊ द्या’ शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांना देण्यात आलेली वागणूक आणि त्यांना आलेला अनुभव फेसबूक पोस्टच्या माध्यमातून शेअर केलाय. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
02 Jul 2025 04:09 PM (IST)
शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण‘ या निवडणूक चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही सूनावणी झालेली नाही. शिवसेना ठाकरे गटाकडून आज (2 जुलैला) सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली. यावेळी न्यायालयाने इतकं तातडीचं काय आहे अशी विचारणा केली. यावेळी ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी लोकांना चिन्ह निवडण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
02 Jul 2025 04:03 PM (IST)
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘धनुष्यबाण‘ निवडणूक चिन्हावरून शिवसेना आणि शिवसेना (यूबीटी) यांच्यातील वादाशी संबंधित प्रकरण १४ जुलैला सु्प्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सादर करण्यात आले. शिवसेना (यूबीटी) कडून बाजू मांडणारे वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी तातडीने सुनावणीची विनंती केली.
02 Jul 2025 04:01 PM (IST)
मुंबई: महाराष्ट्र सरकारने राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये राज्य सरकारने अमली पदार्थांविरुद्ध खूप मोठी कारवाई सुरु केली आहे. मुंबई, पुणे अशा मोठं मोठ्या शहरांमधून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले जात आहे. ड्रग्सची तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
02 Jul 2025 04:00 PM (IST)
राज्यात गेले अनेक दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक जिल्ह्यात अत्यंत जोरदार पाऊस सुरू आहे. दरवर्षी 7 ते 15 जूनच्या आसपास दाखल होणारा मॉन्सूनचे आगमन होते. मात्र यावर्षी 25 मे च्या जवळपासच पाऊस राज्यात दाखल झाला आहे. हवामान विभागाने राज्याला पुढील एक ते दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
02 Jul 2025 03:47 PM (IST)
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी बुधवारी राज्यातील नेतृत्व बदलाचं खडंन करत, 'मीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार आहे, यात शंका आहे का?” असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची मनषा बाळगणाऱ्या डीके शिवकुमार यांची मात्र पंचाईत झाली आहे. दरम्यान सिद्धारमय्या यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या या विधानामुळे कर्नाटक काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचे समोर आली आहे.
02 Jul 2025 03:37 PM (IST)
राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. प्राथमिक शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत हिंदी ही पर्यायी तिसरी भाषा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंबंधित शासन निर्णय आता रद्द करण्यात आला आहे. या विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली होती. ठाकरे बंधू यांनी एकत्रितपणे मोर्चा देखील घोषित केला होता. मात्र यासंबंधित दोन्ही शासन निर्णय राज्य सरकारने रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी एकत्रित विजयी सभा घेण्याचे ठरवले आहे. यावरुन भाजपने जोरदार टीका केली आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
02 Jul 2025 03:36 PM (IST)
ब्रिटनच्या इमिग्रेशन धोरणांमध्ये पुन्हा मोठे बदल करण्यात आले आहेत. पंतप्रधान केयर स्टारमर यांच्या नेतृत्त्वाखाली लेबर पार्टीने सरकारने इमिग्रेशन धोरणांत नव्या सुधारणा केल्या आहेत. २२ जुलै २०२५ पासून हे नवीन नियम लागू होणार असल्याची घोषणा पंतप्रधान केयर स्टारमर यांनी तेली आहे. त्यांनी ब्रिटनच्या इमिग्रेशन धोरणात बदल करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे म्हटले आहे. मात्र या धोरणांमुळे परदेशी कामगारांवर मोठा परिणाम होणार आहे, विशेष करुन भारतीय कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
02 Jul 2025 03:13 PM (IST)
भारत इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारताला इंग्लंडकडून ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे. आज भारत आणि इंग्लंड यांच्यातील दूसरा सामना बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे खेळणार आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारत हा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
02 Jul 2025 03:00 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस आता होताना दिसत आहे. त्यातच गडचिरोलीत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अशातच मंगळवारी (दि.1) जिल्ह्यातील विविध ठिकाणी नद्या, नाल्यांवर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने कुरखेडा तालुक्यातील 5 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
02 Jul 2025 02:29 PM (IST)
मोहम्मद शमी त्याच्या घटस्फोटामुळे खूप वेळा चर्चेत येत असतो. दरम्यान, कोलकाता उच्च न्यायालयाने शमीला मोठा झटका दिला आहे. उच्च न्यायालयाने आपला निर्णयात म्हटले आहे की, "मोहम्मद शमीला त्याची माजी पत्नी हसीन जहाँला दरमहा ४ लाख रुपये पोटगी द्यावी लागेल."
02 Jul 2025 01:58 PM (IST)
कमकुवत बाजारात टाटा कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स ट्रेंडच्या विरुद्ध व्यवहार करत आहेत. बुधवारी व्यवहारादरम्यान कंपनीचे शेअर्स ४% पेक्षा जास्त वाढले आणि दिवसाच्या उच्चांकी १८०३ रुपयांवर पोहोचले. त्याची मागील बंद किंमत १७२८.४० रुपये होती.शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागे एक सकारात्मक बातमी आहे. खरं तर, जागतिक ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने टाटा कम्युनिकेशन्सवर कव्हरेज सुरू केले आहे आणि ‘आउटपरफॉर्म’ रेटिंगसह प्रति शेअर ₹ २,३०० चे लक्ष्य दिले आहे. हे मंगळवारच्या बंद किंमतीपेक्षा ३०% पेक्षा जास्त वाढीची संभाव्य शक्यता दर्शवते.
02 Jul 2025 01:47 PM (IST)
दिल्लीमध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या एका सरकारी सर्वेक्षणात संकटग्रस्त महिलांसाठी सुरू असलेल्या मासिक पेन्शन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे. या सर्वेक्षणात सुमारे ६०,००० महिला या योजनेसाठी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेत असल्याचे उघडकीस आले आहे. महिलांच्या पात्रतेचे निकष पूर्ण होत नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अधिक काटेकोरपणे तपासली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
02 Jul 2025 01:25 PM (IST)
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन अॅप लाँच केले आहे. प्रवास अधिक सोपा आणि सुखाचा व्हावा, यासाठी हे नवं अॅप लाँच करण्यात आलं आहे. रेल्वेने लाँच केलेल्या या नव्या अॅपचं नाव RailOne आहे. हे एक सुपरअॅप आहे, जिथे प्रवाशांना तिकीट बुकिंगपासून PNR स्टेटसपर्यंत सर्व सुविधा मिळणार आहेत. हे अॅप प्रवाशांना अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते, ज्यामुळे वेगवेगळे अॅप्स डाऊनलोड करण्याची गरज भासत नाही. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेंटर ऑफर रेलवे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) च्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त हे सुपरअॅप लाँच केले आहे.
02 Jul 2025 01:20 PM (IST)
मागील काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटाचे आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे हे चर्चेत आले होते. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे त्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडसोबत त्यांचे संबंध असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप देखील करण्यात आले. यामध्ये सर्वात आघाडीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया होत्या. दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आरोपांची सरबत्ती लावली होती. यानंतर आता आणखी एका बीडमधील प्रकरणावरुन अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
02 Jul 2025 01:13 PM (IST)
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या भ्याड कृत्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानी दहशतवादी संघटनांविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या रागाचा फटका पाकिस्तानी कलाकारांवरही पडला. परिणामी, त्या कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतात बंदी घालण्यात आली. या हल्ल्याला अवघ्या दोन महिने झाले आहेत आणि एका घटनेने लोकांना आश्चर्यचकित केले आहे. ‘सनम तेरी कसम’ फेम अभिनेत्री मावरा होकेनच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील बंदी भारतात उठवण्यात आली आहे. हे पाहिल्यानंतर वापरकर्तेही आश्चर्यचकित झाले आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत.
02 Jul 2025 01:10 PM (IST)
जेव्हा तुम्ही कोणत्याही बँकेत बचत खाते उघडता तेव्हा अनेक बँकांच्या नियमांनुसार बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणे आवश्यक असते. जर तुमची शिल्लक किमान शिल्लकपेक्षा कमी असेल तर बँक तुमच्याकडून दंड आकारते, परंतु आता देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकांपैकी एक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेने हा दंड रद्द केला आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचे बचत खाते पंजाब नॅशनल बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे.
02 Jul 2025 01:00 PM (IST)
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागातील तीन अधिकारी, अभियांत्रिकी विभागातील एका महिला अधिकाऱ्याची बदली तर दोन अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती झाली आहे. पीएमआरडीएत महसूल विभागासह शासनाच्या विविध विभागांतून अधिकारी प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. या अधिकार्यांची नियुक्ती जमीन व मालमत्ता, अतिक्रमण निर्मूलन, विकास व परवानगी विभागांमध्ये करण्यात आलेली असते. या यंत्रणेत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि वरिष्ठ अभियांत्रिकी अधिकारी यांचा समावेश असतो.
02 Jul 2025 12:38 PM (IST)
ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय पवार यांनी वरिष्ठांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत उपनेतेपदाचा दिला होता राजीनामा. त्यानंतर संजय पवार यांना शिंदे गटाकडून खुली ऑफरही देण्यात आली होती. मात्र शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवरुन चर्चा केल्यानंतर संजय पवार यांची नाराजी झाली दूर . आज बुधवारी दुपारी दीड वाजता संजय पवार हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला येणार आहेत.
02 Jul 2025 12:25 PM (IST)
बस ट्रान्सपोर्ट असोसिएशच्या शिष्टमंडळाची आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक होणार आहे. बस चालकांच्या मागण्यांसंदर्भात आजच्या बैठकीत तोडगा निघणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यातील खासगी बस मालकांचा आज होणारा संप मागे घेण्यात आला आहे. आज होणारं स्कूल बस मालकांचं आंदोलनही पुढे ढकलण्यात आलं आहे.
02 Jul 2025 12:12 PM (IST)
वीजपडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना 10 लाखाची मदत करा, अशी मागणी अधिवेशनात काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वड्डेटीवार यांनी केली. तर, मात्र चार लाखाची मदत 10 लाख करा अशी मागणी वड्डेटीवार यांनी केली.
02 Jul 2025 11:50 AM (IST)
विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी करत आहेत. महाविकास आघाडीतील नेते या घोषणाबाजीमध्ये सहभागी झाले आहेत. शक्तिपीठाविरोधात काँग्रेसनेते आक्रमक झाले असून शेतकऱ्यांची सरकारने फसवूक केल्याच्या घोषणा देण्यात येत आहेत. विजय वडेट्टीवार, सतेज पाटील या तसेच अंबादास दानवे देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
02 Jul 2025 11:48 AM (IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी घानाला विमानाने रवाना झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेतही सहभागी होणार आहेत.
02 Jul 2025 11:14 AM (IST)
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रितपणे विजयी सभा पार पडणार आहे. याची जोरदार तयारी सुरु झाली असून ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे सर्वांचे लक्ष या सभेकडे लागले आहे. ही सभा येत्या 05 जुलै रोजी वरळी येथील एन एस सी आय डोममध्ये पार पडणार आहे. याची ठाकरे गट आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे.
02 Jul 2025 11:12 AM (IST)
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरुन बच्चू कड़ू यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रहार नेते बच्चू कडू म्हणाले की, लोणीकर ज्या पद्धतीने बोलताय आणि कृषीमंत्री देखील बोलताय त्यामुळे त्याला माफी मागून चालणार नाही. तर ठोकून पुरून उरलं पाहिजे. शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे.’, असं बच्चू कडू म्हणाले.
02 Jul 2025 11:10 AM (IST)
बीडमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वाद वाढला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अंजली दमानिया यांनी लिहिले आहे की, काल धनंजय मुंडेंना बीड च्या अल्पवयीन मुलीवर भाश्य करताना बघून खूप राग आला. जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो, ज्याच्यावर महिला अत्याचाराच्या केसेस आहेत, त्याचे म्हणणे मुख्यमंत्री एका दिवसात ऐकून एका महिला आयपीएस ची SIT लावतात? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
02 Jul 2025 10:47 AM (IST)
भारतातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या Vi (Vodafone Idea) ने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक नवीन Vi गॅरंटी प्रोग्राम लांँच केला आहे. याबाबत कंपनीने मंगळवारी घोषणा केली असून हा प्रोग्राम 2G हँडसेट ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे.
02 Jul 2025 10:40 AM (IST)
उपराजधानी नागपूरातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. घरात झोपलेल्या चिमुकलीचा अपहरण करून लैंगिक चाळे करण्याचा एका नराधमाचा प्रयत्न फसला आहे. या घटनेचा आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला अटक केली आहे.
02 Jul 2025 10:35 AM (IST)
आपल्याला मजा वाटावी म्हणून मुक्या प्राण्यांना आधिपासून वाईट वागणूक दिली जात आहे. आताच्या व्हिडिओतही तसेच काहीसे घडले मात्र यावेळी तर सर्वच मर्यादा ओलांडल्या गेल्या. व्हिडिओत एका श्वानाला जिवंत मातीत पुरण्यात आले. जिवंतपणे आपल्याला पुरले जात आहे ही भावनाच किती वेदनादायी आहे याचा विचार करा.
02 Jul 2025 10:28 AM (IST)
वर्ग शिक्षकाने रागावल्याच्या कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवलं होत. मृतकाचे नाव विनायक महादेव राऊत (वय 15, रा. वसाडी बु.) असे आहे. विनायक बजरंग विद्यालयात दहावीमध्ये शिक्षण घेत होता. या घटनने बुलढाण्यात हळहळ व्यक्त केला जात आहे.
02 Jul 2025 10:28 AM (IST)
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर, वॉशिंग्टनमध्ये पार पडलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनाने पाकिस्तानच्या दहशतवादाला समर्थन देणाऱ्या धोरणावर थेट बोट ठेवले, आणि जागतिक स्तरावर त्याचा दबाव अधिक वाढवला आहे.
02 Jul 2025 10:27 AM (IST)
अवजड वाहने आणि खासगी बस चालक व मालकांकडून राज्यभरात बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. या संपात मुंबईतील सुमारे 30 हजार शाळांची वाहतूक करणाऱ्या खासगी बसेसचा समावेश असेल असेही म्हटले जात होते. मात्र, अवजड वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा संप तूर्त मागे घेण्यात आला आहे.
02 Jul 2025 09:57 AM (IST)
राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीकरणाचा निर्णयावरून चांगलच रान तापलं होतं. पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र येत या हिंदी सक्तीला टोकाचा विरोध केला. मनसे आणि ठाकरे गटाच्या आक्रमकतेपुढे राज्य सरकारला निर्णय मागे घ्यावा लागला. हिंदी सक्तीविरोधात येत्या ५ जुलैला मनसे आणि ठाकरे गटाची विजयी सभा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, येत्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकीसंदर्भात उद्धव ठाकरेंनी निमंत्रण पत्रिकाच प्रसिद्ध केली आहे.
02 Jul 2025 09:56 AM (IST)
काळे चणे हे प्रथिनांनी समृद्ध आहेत. याच्या सेवनाचे आपल्या शरीराला अनेक फायदे होत असतात. अनेकदा यापासून मसालेदार भाजी तयार केली जाते मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही यापासून एक टेस्टी नाश्त्याचा प्रकार तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला काळ्या चण्यांपासून चवदार टिक्की कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.
सविस्तर बातमी- सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा प्रथिनेयुक्त काळ्या चण्यांचे कटलेट
02 Jul 2025 09:52 AM (IST)
घरातील परिस्थिती आणि आर्थिक तणावातून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. नदीच्या काठावर पोहोचून पत्नीला फोन केला. ‘पोरांना सांभाळ, मी आत्महत्या करत आहे’, असे म्हणत नदीच्या पात्रात उडी घेतली. मात्र, वेळीच तेथे पोहोचलेल्या पोलिस आणि गावकऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी ही घटना नागपुरात घडली.
02 Jul 2025 09:35 AM (IST)
2 जुलै रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,841 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,021 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,381रुपये आहे. 1 जुलै रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,589 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,914 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,293 रुपये होता. भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,210 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 98,410 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,810 रुपये आहे.
02 Jul 2025 09:30 AM (IST)
२ जुलै रोजी आज बुधवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक होऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, किंचित वाढीसह उघडण्याची अपेक्षा आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी सौम्य सकारात्मक सुरुवात दर्शवितात. संभव स्टील ट्यूब्सचा आयपीओ २ जुलै रोजी भारतीय शेअर बाजारात दाखल होणार आहे. संभव स्टील ट्यूब्सच्या आयपीओचे शेअर्स बुधवारी बीएसई आणि एनएसई दोन्ही एक्सचेंजेसवर सूचीबद्ध होतील, अशी माहिती देण्यात आली आहे.
02 Jul 2025 09:25 AM (IST)
देशातील काही राज्यांत पावसाची जोरदार बॅटिंग पाहिला मिळत आहे. तर काही ठिकाणी पाऊस तुरळक प्रमाणात दिसून येत आहे. महाराष्ट्रातही काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी पावसाची चिन्हेदेखील पाहिला मिळत नाहीत. मात्र, हिमाचल प्रदेशात पावसाने अक्षरश: कहर केला आहे. मंडीच्या धरमपूर, लॉंगनी येथे ढगफुटी झाल्याची माहिती दिली जात आहे. या ढगफुटीमुळे कारसोग खोऱ्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यामध्ये 7 ते 8 घरांसह अनेक भागातील वाहनेही वाहून गेली आहेत.
02 Jul 2025 09:22 AM (IST)
बसचा प्रवास अनेकदा सुलभ मानला जातो. आपल्याला फक्त तिकीट खरेदी करायचे आहे आणि बस प्रवासाला निघा. मात्र बसचा प्रवास कधीकधी त्रासदायक देखील ठरू शकतो. याचे कारण म्हणजे बऱ्याचदा जेव्हा आपण बसमध्ये चढतो तेव्हा अधिकतर जागा या भरलेल्या असतात ज्यामुळे आपल्याला उभा राहून प्रवास करावा लागतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, आता तुम्हाला या त्रासाला सामोरे जाण्याची काहीच गरज नाही कारण आता तुम्ही ट्रेनप्रमाणेच बसचेही ॲडव्हान्स बुकिंग करू शकता. विशेष म्हणजे यात तुम्हाला खास सवलत देखील दिली जाईल.
02 Jul 2025 09:18 AM (IST)
घरातील परिस्थिती आणि आर्थिक तणावातून एका तरुणाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. नदीच्या काठावर पोहोचून पत्नीला फोन केला. ‘पोरांना सांभाळ, मी आत्महत्या करत आहे’, असे म्हणत नदीच्या पात्रात उडी घेतली. मात्र, वेळीच तेथे पोहोचलेल्या पोलिस आणि गावकऱ्यांनी पाण्यातून बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. ‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी ही घटना नागपुरात घडली.
02 Jul 2025 09:15 AM (IST)
अखेर तो दिवस उजाडलाच! स्मार्टफोन युजर्स ज्याची वाट पाहत होते, तो प्रिमियम Nothing Phone 3 अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटची किंमत प्रिमियम रेंजमध्ये आहे. शिवाय या स्मार्टफोनची डिझाईन कंपनीच्या इतर स्मार्टफोनपेक्षा पुर्णपणे वेगळी आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर गेल्या काही दिवसांपासून या स्मार्टफोनचे अपडेट शेअर केले जात होते. याशिवाय कंपनी सतत स्मार्टफोनबाबत नवीन पोस्ट्स देखील शेअर करत होती. त्यामुळे स्मार्टफोन युजर्सची उत्सुकता प्रचंड वाढली होती. मात्र आता अखेर हा स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला आहे.
Phone (3) is here. Come to Play.
Pre-order yours. 4 July. pic.twitter.com/k92AZBO7lf
— Nothing (@nothing) July 1, 2025
02 Jul 2025 09:12 AM (IST)
तुम्ही आजवर समुद्रात उसळणाऱ्या लाटा बऱ्याचदा प्रत्येक्षात पहिल्या असतील. याचे व्हिडिओ देखील बऱ्याचदा सोशल मीडियावर शेअर केले जातात मात्र आता एक अद्भुत चमत्कार घडून आला आहे ज्यातील दृश्ये पाहून सर्वांचेच डोळे खुलेच्या खुले राहिले. हे दृश्य इतके अनोखे आणि दुर्लभ आहे की पाहणाऱ्याने मनभरून डोळ्यात साठवून ठेवले. वास्तविक, पोर्तुगालच्या समुद्रकिनाऱ्यावर हे दृश्य दिसले आहे ज्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. व्हिडिओ शेअर होताच लोक या दृश्यांनी आश्चर्यचकित झाले आणि अवघ्या काही क्षणातच हा व्हिडिओ व्हायरल झाला.