World Mosquito Day 2025 : २०२५ मध्ये का वाढला आहे डासांचा धोका? जाणून घ्या उपाय आणि प्रतिबंध ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
World Mosquito Day 2025 : दरवर्षी २० ऑगस्ट रोजी जागतिक डास दिन (World Mosquito Day) साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला ब्रिटिश शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांच्या महान शोधाची आठवण करून देतो. १८९७ साली त्यांनी डास आणि मलेरिया यांचा थेट संबंध उघडकीस आणला आणि तेव्हापासून मानवजातीला डासांविरुद्ध लढण्यासाठी दिशा मिळाली.
२०२५ मध्ये या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे, कारण डास आजही जगातील सर्वात धोकादायक कीटक मानले जातात. आकाराने लहान असले तरी डास दरवर्षी लाखो लोकांना डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, झिका, जपानी एन्सेफलायटीस आणि पिवळा ताप यांसारख्या आजारांनी त्रस्त करतात. या आजारांपैकी काही जीवघेणे ठरू शकतात. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि वृद्ध यांना त्यांचा जास्त धोका असतो.
या वर्षीच्या जागतिक डास दिनाची थीम आहे “अधिक समतापूर्ण जगासाठी मलेरियाविरुद्धच्या लढाईला गती देणे”. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, जगभरात अब्जावधी लोक दरवर्षी या आजारांच्या विळख्यात सापडतात. त्यामुळे डास नियंत्रण आणि प्रतिबंध हीच खरी सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे.
हे देखील वाचा : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!
मलेरिया – अॅनोफिलिस डासामुळे पसरतो. ताप, थंडी, अशक्तपणा ही प्रमुख लक्षणे.
डेंग्यू – एडिस इजिप्ती डास पसरवतो. उंच ताप, लाल पुरळ, तीव्र अंगदुखी, सांधेदुखी होते.
चिकनगुनिया – दीर्घकाळ टिकणारी सांधेदुखी आणि उंच ताप.
झिका विषाणू – गर्भवती महिलांसाठी धोकादायक; मुलांमध्ये जन्मजात दोष उद्भवू शकतो.
जपानी एन्सेफलायटीस व पिवळा ताप – मेंदू आणि यकृतावर परिणाम करणारे आजार.
डास नेहमी साचलेल्या पाण्यात आणि अस्वच्छतेत वाढतात. जर आपण आपल्या परिसरात स्वच्छता राखली, तर डासांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी करता येते.
घरातील भांडी, कूलर, ट्रे यामधील पाणी नियमित बदला.
पाण्याच्या टाक्या व बादल्या नेहमी झाकून ठेवा.
घराभोवती नाले, खड्डे यामध्ये पाणी साचू देऊ नका.
कचरा साचू देऊ नका, वेळेवर टाकून द्या.
भारतीय पारंपरिक उपाय आजही प्रभावी ठरतात:
कडुलिंबाचे तेल व कापूर – पाण्यात मिसळून फवारणी करा किंवा कापूर जाळून खोलीत ठेवा.
तुळशीचे रोप – घरात लावल्याने डास दूर राहतात.
लसूण व पुदिन्याचे तेल – दोन्हींचा वास डासांना सहन होत नाही.
मोहरी व नारळाचे तेल – मिश्रण शरीरावर लावल्यास डास चावत नाहीत.
लिंबू-लवंगा उपाय – लिंबाच्या तुकड्यांत लवंगा खोवून खोलीत ठेवा.
हे देखील वाचा : इजिप्तपासून भारतापर्यंत… काय आहे ‘Black Cat’s’ चा गूढ इतिहास?
विशेषतः मुलांसाठी मच्छरदाणी वापरा.
बाहेर जाताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला.
घरातील खिडक्या-दारे जाळीदार ठेवा.
स्वच्छता मोहीमेत सहभाग घ्या आणि इतरांनाही जागरूक करा.