सोलापुरातील एमआयडीसीत कारखान्याला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू (फोटो-istockphoto)
सोलापूर : सोलापुरातील एमआयडीसीत एका कारखान्याला भीषण आग लागली. ही आग मध्यरात्री तीनच्या सुमारास लागल्याची माहिती दिली जात आहे. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला असून, पाच ते सहा कामगार कारखान्यातच अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सोलापूर शहरातील अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागली. सोलापूरमधील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीनच्या सुमारास आग लागली आणि पाहता पाहता या आगीने अतिशय रौद्ररूप धारण केलं. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 3 जणांना कारखान्यातून बाहेर काढलं आहे. या आगीत तिघांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला आग लागली असून, पाच ते सहा जण आतच अडकून पडल्याची भीती व्यक्त होत आहे. तर, आगीतून बाहेर काढलेल्या तिघांची अवस्था अजून गंभीर असून, त्यांना उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या दाखल झाल्या आहेत. पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग लागून चार तास उलटून गेल्यानंतरही ही आग विझलेली नाही. कारखान्यात आणखी पाच ते सहा कामगार अडकून पडले आहेत.
टॉवेल बनवले जात होते कारखान्यात
सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्यात टॉवेल तयार केले जात असल्याचे सांगण्यात आले आहे. टॉवेलच्या याच साहित्यामुळे आग आणखीनच पसरत गेल्याचे समजते. ही आग इतकी भीषण होती की, दूरवरूनही याच्या ज्वाला दिसून येत होत्या.