सातारा : सातारा जिल्ह्यातील वडूज, औंध, उंब्रज येथे दरोडा टाकणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या होमराज उर्फ होम्या उद्धव काळे याच्यासह नऊ जणांच्या बीड जिल्ह्यातील टोळीला पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दुसऱ्यांदा मोक्काअंतर्गत कारवाई केली. या प्रस्तावाला विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी नुकतीच मंजुरी दिली आहे.
होमराज उर्फ होम्या उद्धव काळे (वय 40 रा. वाकी शिवार, तालुका आष्टी, बीड) हा टोळीचा प्रमुख आहे. अजय उर्फ आजा सुभाष भोसले (वय 23 रा. माहिजळगाव, तालुका कर्जत, नगर), सचिन उर्फ आरसी सुभाष भोसले (वय 24 रा. माहिजळगाव तालुका कर्जत) अविनाश उर्फ महिंद्रा सुभाष भोसले वैद्य (वय 22 माहिजळगाव तालुका कर्जत), राहुल भोसले (वय 28 रा. पारगाव पोस्ट पाथर्डी, नगर), अतुल लायलन भोसले (रा.आष्टी, बीड), भल्या उर्फ धर्मेंद्र काळे (रा. चिखली तालुका आष्टी), कानिफनाथ उद्धव काळे (रा. वाकी तालुका आष्टी), गणेश उर्फ बन्सी काळे (रा. राशीन) अशी टोळी सदस्यांची नावे आहेत.
या टोळीने उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये लुटमारीचे गुन्हे केले होते. वडूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत खडकाचा माळ शिवारात फिर्यादीच्या घराचा दरवाजा उचकटून फिर्यादीची पत्नी शांताबाईच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांच्या घरातील एक लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता.
वडूज पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या टोळीने आर्थिक फायद्यासाठी सातारा जिल्ह्यातील वडूज, औंध, उंब्रज तसेच महाराष्ट्रातील पुणे, बीड, नगर जिल्ह्यातील पोलिस ठाणे हद्दीत जबरी चोऱ्यांचे प्रकार केले होते. सोन्या-चांदीचे दागिने लांबवणे, रोख रकमेची लूटमार करणे, जबर दुखापत करणे, इत्यादी गुन्ह्यांची नोंद या टोळीवर होती.