राणी लंकेंच्या उमेदवारीनंतर शिवसैनिक बंडाच्या तयारीत; शिवसैनिकांच्या स्वतंत्र मेळाव्याचे आयोजन
अहिल्यानगर: विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंकेंच्या उमेदवारीनंतर पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमध्ये नाराजीनाट्य सुरू झाल्याचे पाहायला मिळते. पारनेरची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्याने येथील शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाकडून तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे व उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले हे इच्छुकांच्या यादीमध्ये आघाडीवर होते. मात्र महाविकास आघाडीने विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी जाहीर केली.
हेदेखील वाचा- आजचा सत्कार सिंधुदुर्गच्या इतिहासातील काळा दिवस, कणकवली तालुक्यात राजकीय बॅनरबाजी
राणी लंकेंच्या उमेदवारीमुळे नाराज झालेले शिवसैनिक आता बंडाच्या तयारीत असल्याचे समजते. याबाबत उद्या पारनेरमध्ये शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सध्या राज्यामध्ये विधानसभेच्या जागांमधून जागा वाटपांवरून महायुती व महाविकास आघाडीमध्ये मोठे घमासान सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातही जागा वाटपावरून चांगलेच राजकारण तापल्याचे दिसते आहे.
श्रीगोंद्यामध्ये काल झालेल्या ‘राजकीय ट्विस्ट’ नंतर आता पारनेरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून विद्यमान खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना एबी फॉर्म दिला गेल्याने येथील शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे पक्षाकडून तालुका प्रमुख डॉ. श्रीकांत पठारे व उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले हे इच्छुकांच्या यादीमध्ये आघाडीवर होते.
डॉ.पठारे व संदेश कार्ले यांनी उमेदवारीसाठी महाविकास आघाडीतील वरिष्ठ पातळीवरील सर्व नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन तालुक्यातील राजकीय परिस्थिती तसेच शिवसैनिकांची इच्छा सांगितली होती. तसेच खासदार निलेश लंके यांनी देखील मोठ्या मनाने ही जागा शिवसेनेला सोडावी अशी देखील गळ शिवसेनेकडून घालण्यात आली होती. परंतु असे न होता राणी लंके यांना पक्षाकडून एबी फॉर्म मिळाल्याने पारनेर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये व त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजीचा सुर पहायला मिळाला व शिवसैनिकांमध्ये अन्यायाची भावना पसरल्याचे चित्र पहायला मिळाले.
हेदेखील वाचा- Maharashtra Assembly election 2024 : अखेर ठरलं! बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार देणार लढत
डॉ.श्रीकांत पठारे यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांनी रात्री उशीरापर्यंत गर्दी केली होती. याच पार्श्वभुमीवर त्यांनी गुरुवार दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता आनंद मंगल कार्यालयात शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना डॉ. श्रीकांत पठारे यांनी सांगितले की, तालुक्याचे शिवसेनेला जागा मिळाली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी पक्षाच्या भूमिकेसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी समर्थक व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसैनिकांवर अन्याय झाल्याची भावना मनाला वेदना देणारी असून हजारो कार्यकर्ते भेटायला येत आहेत.