Sangli News: मिरजेत पावणे दोन कोटींचा गांजा जप्त, ३०० किलो गांजा आणि २५ लाखांचा कंटेनर ताब्यात; ओडिशातून विक्रीसाठी पुण्याकडे
सांगली : ओडिशातून महाराष्ट्रात आणण्यात आलेला तब्बल ३०० किलो गांजा सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मिरज तालुक्यातील तानंग फाटा परिसरात पकडला. गांजाची किंमत सुमारे १ कोटी ५० लाख रुपये, तर वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या सहाचाकी अशोक लेलँड कंटेनरची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे. याशिवाय एक मोबाईल असा एकूण १ कोटी ७५ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी मंगेश प्रकाश मोरे (वय ४६, रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) याला अटक करण्यात आली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज-पंढरपूर मार्गावरून एका कंटेनरमधून गांजाची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मिरज-पंढरपूर महामार्गावरील तानंग फाटा ते मालगाव जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावला.
काही वेळाने संशयित कंटेनर त्या मार्गावरून येताना दिसताच पोलिसांनी तो अडवून तपासणी केली. कंटेनरच्या चालकाच्या केबिनमध्ये असलेल्या कप्प्याची तपासणी केली असता त्यामध्ये खाकी रंगाची पाकिटे आढळून आली. या पाकिटांची पंचांसमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये हिरवट-काळपट रंगाच्या फुलोऱ्यांचा तयार गांजा असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांच्या तपासणीत सुमारे दोन किलो वजनाची १५० पाकिटे आढळून आली. या सर्व पाकिटांमध्ये मिळून सुमारे ३०० किलो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण गांजा ताब्यात घेतला.
जप्त केलेल्या गांजाची किंमत पोलिसांनी प्रति किलो ५० हजार रुपये, याप्रमाणे सुमारे १ कोटी ५० लाख रुपये निश्चित केली आहे. गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला अशोक लेलँड कंपनीचा सहाचाकी कंटेनरही पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत सुमारे २५ लाख रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे. कंटेनरचा क्रमांक NL-01-AD-9366 आहे. त्यासोबत एक मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी संशयित मंगेश मोरे याच्याकडे चौकशी केली असता, त्याने हा गांजा ओडिशा राज्यातील बालेगोडा आणि तुंबडी परिसरातील एका शेतातून आणल्याचे सांगितले. हा गांजा पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, हा गांजा नेमका कोणाकडून घेतला आणि पुण्यात कोणाला विक्री करण्यात येणार होती, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.
जप्त करण्यात आलेल्या गांजाची पुढील विक्री कोणाला होणार होती, या साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गांजाच्या पुरवठ्यामागे आणखी कोण व्यक्ती किंवा टोळी कार्यरत आहे का, ओडिशातून यापूर्वी अशाच प्रकारे गांजाची वाहतूक झाली आहे का, तसेच पुण्यातील संभाव्य ग्राहक कोण आहेत, याचा तपास केला जात आहे.
या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातून गांजाची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याच्या शक्यतेवरही पोलिसांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
कोळसा प्रकल्पग्रस्तांना मिळणार मोबदला? मुख्यमंत्र्यांकडून दखल; केंद्राकडे फेरविचाराचा प्रस्ताव सादर
सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाईत पोलिस अंमलदार व कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता.
मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त गांजा कुठे विक्री केला जाणार होता आणि या तस्करीमागील इतर व्यक्ती कोण आहेत, याबाबत पुढील तपास सुरू आहे.






