नाशिक: राष्ट्रवादीच्या (Rashtrawadi Congress) नाशिकमधील देवळाली येथील आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) नॉट रिचेबल होत्या. त्या नेमक्या शरद पवारांच्या बाजूने आहेत की अजित पवारांच्या बाजूने आहेत, हे समजत नव्हतं. मात्र त्यांनी आज माध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. पवारसाहेब आणि अजितदादा यांच्यापैकी एकाला निवडणं म्हणजे आमच्यासाठी जीवन मरणासारखा प्रश्न आहे, असं सरोज अहिरे यांनी सांगितलं आहे.
मी अजित पवार यांना भेटले त्यानंतर काल शरद पवारांना देखील भेटून आले. सुप्रिया ताईंशीही माझं बोलणं झालं आहे. तब्येत ठीक नसल्याने सध्या दवाखान्यात दाखल झाले आहे. मात्र लवकरच माझ्या मतदारसंघातील नागरिक आणि नेत्यांशी बोलून मी योग्य तो निर्णय घेणार आहे, असं सरोज अहिरे यांनी सांगितलं आहे.
दोन मेळावे, दोन गट यामुळे खूप मानसिक त्रास होत आहे. त्यामुळेच मला दवाखान्यात जावं लागलं आहे. रुग्णालयातलं सगळं आटपलं की मी या विषयावर सविस्तर बोलेन. अजित पवारांच्या समर्थनार्थ सर्व आमदार सही करत होते, मी देखील सही केली. मात्र मला काही माहिती नव्हतं. मात्र त्यानंतर मी लगेच सुप्रिया ताईंशी बोलले, असंही सरोज अहिरे यांनी सांगितलं.
मी निगरगट्ट राजकारणी नसून मी भावनिक आहे. माझ्यासाठी दोघांमधून एकाला निवडणं खरंच कठीण आहे. हा माझ्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न आहे. आई आणि बायको यातून निवडणं जसं कठीण तसं पवार साहेब आणि अजितदादा यांच्यातून निवड करण्याचं काम कठीण आहे. आमच्या नेत्यांवर आमचा आंधळा विश्वास असतो त्यामुळे मी सही केली. मी सही केल्यामुळे अजितदादा माझा पाठिंबा आहे, असं गृहीत धरू शकतात. पण मी माझी भूमिका अधिवेशनापूर्वी मांडेन, असं सरोज अहिरे यांनी स्पष्ट केलं आहे. एक वर्षांनी निवडणुका असल्याने हा मोठा प्रश्न आहे.
दरम्यान मी गिरीश महाजन यांच्यामुळे निवडून आलेली नाही, तसं सिद्ध करून दाखवा, मी राजीनामा देईन,असंही त्या म्हणाल्या. येवल्यात होणाऱ्या सभेत मी बरे वाटले तर जाईन, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राजकारणात कधी काहीही होऊ शकतं याचं मी आकलन करू शकत नाही,असं अहिरे यांनी सांगितलं.