संग्रहित फोटो
माळशिरस : माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी मुद्यावरून सुरू असलेले बॅलेट विरुद्ध ईव्हीएम लढाई दिल्ली दरबारी पोहोचणार आहे. आमदार उत्तम जानकर आपल्या राजीनाम्याचे पत्र घेऊन दिनांक २३ जानेवारीला निवडणूक आयोगाकडे देणार आहेत. मागणी मान्य न झाल्यास दिनांक २४ रोजी पासून जंतरमंतरवर उपोषण सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेत मोहिते-पाटील गटाच्या साथीनं उत्तम जानकर निवडून आले. मात्र त्यानंतर मारकडवाडी येथे बॅलेट विरुद्ध ईव्हीएम नाट्यमय घडामोडी पार पडल्या. त्यानंतरही काही ग्रामपंचायतींनी असा सूर मिसळला. अखेर या लढ्यासाठी खुद्द आमदार जानकर यांनी उडी घेत राजीनाम्याचे पत्र तयार केले आहे. बच्चू कडू यांच्यासमवेत दिल्ली दरबारी जाणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.
उत्तम जानकर म्हणाले, माळशिरस विधानसभा निवडणूक सन २०२४ महाराष्ट्रामधून मी उभा होतो. माझे मतदारसंघाचे जवळजवळ १,०८,००० इतकी मते भाजप उमेदवारास गेलेली दिसतात. मतदानाबाबत प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात उद्रेक आहे. मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्या पाठोपाठ धानोरे गावाने बॅलेटवर परवानगी देत नाहीत, म्हणून हात उंचावून मतदान घेतले. अशीच परिस्थिती सर्व गावांमध्ये आहे. सर्व मतदारसंघामधील मतदारांना पुन्हा बॅलेट पेपरवर किंवा व्ही. व्ही. पॅटमधून चिठ्ठी हातामध्ये घेऊन ती मतदाराच्या हाताने व्ही. व्ही. पॅटमध्ये टाकणे अशी पद्धत वापरून फेर मतदान घ्यावे असे मत आहे. असे पारदर्शी मतदान घेण्यासाठी मी माझ्या आमदार पदाचा राजीनामा आपल्याकडे सादर करत आहे. तरी बॅलेट पेपरवर किंवा चिट्ठी आमच्या हाताने बॉक्समध्ये टाकण्याच्या अटीवर माझ्या मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यात यावी, असं जानकर म्हणाले.
हे सुद्धा वाचा : मुंढव्यात ‘दम मारो दम’; हाॅटेलमधील हुक्का पार्लरवर गु्न्हे शाखेची कारवाई
धानोरे गावाने दिला ठराव
मारकडवाडी गावानंतर तालुक्यातील धानोरे गावाने आमची मतं नेमकी गेली कुठे हे निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर अथवा चिठ्ठी काढून दाखवावे, असा सूर गवसत १२०० नागरिकांनी हात उंचावून मतदान जाहीर केले. याबाबतचा ठरावही करण्यात आला आहे.