भगवान गडाने धनंजय मुंडेंची बाजू घेतल्यामुळे मनसे नेते प्रकाश महाजन आक्रमक झाले आहे (फोटो - सोशल मीडिया)
सोलापूर : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणामुळे राजकारण तापले आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे विरोधकांसह सत्ताधारी देखील आक्रमक झाले. बीड हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यांच्या राजीनाम्याची मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील केली. यानंतर भगवानबाबागडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. यामुळे आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महंत नामदेव महाराज शास्त्री यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाश महाजन म्हणाले की, “नामदेव शास्त्री यांचा ज्ञानेश्वरीवर गाढा अभ्यास आहे, स्वतःला न्यायाचारी पदवी लावतात,त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा आणि कोणाचं समर्थन करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. यानिमित्ताने ते राजकारणात आले आहेत,त्यामुळे काही वेळा स्तुती आणि काही वेळा टीका होईल या दोन्हीची तयारी त्यांनी ठेवली पाहिजे. त्यांनी धनंजय मुंडे यांना पाठिंबा देणं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पंकजा मुंडेनी गडावरून राजकारण करायचं नाही म्हणून 2015 ला गडावर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा खंडित केली. आज 10 वर्षानंतर अशी काय घटना घडली की गडाचे दरवाजे राजकारणासाठी उघडे झाले,” असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “2015 ला पंकजा मुंडेंना दसरा मेळावा गडाच्या पायथ्याशी घ्यावा लागला. 2016 ला भगवान बाबांच्या जन्मगावी मेळावा घेतला आणि ती परंपरा चालू राहिली या सर्व गोष्टींचा मी साक्षीदार आहे. ज्या भगवान गडाने पंकजा मुंडेला एकट सोडलं त्याच भगवान बाबांच्या लाखो शिष्यांनी त्यांना तळ हातावर उचलून घेतलं. कारण भगवान बाबांचा खरा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. आज महंत आव्हान करतायत त्यात कांही वावग नाहीये. त्यांनी करावं. मात्र पंकजा मुंडे या केवळ महिला आणि आबला होत्या म्हणून तुम्ही त्यांना न्याय नाकारला का..?” असा सवाल पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाबद्दल अपडेट घ्या जाणून एका क्लिकवर
पुढे प्रकाश महाजन यांनी भगवान गडाने पंकजा मुंडेंबाबत भेदभाव केला असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “तुम्ही न्यायाचारी आहात तर तुमच्यासमोर न्याय करताना हा भेदभाव का आहे. ज्या ज्ञानेश्वरीमुळे तुम्हाला डॉक्टरेट मिळाली. त्या संत ज्ञानेश्वरांनी आपली बहीण मुक्ताबाई विषयी काय वागणं होत हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं असत तर तुम्ही पंकजाला नाकारलं नसत. या दुहेरी मापदंडाचे आपल्याकडे काय उत्तर आहे? असं काय मोठं दिव्य केलं की धनंजय मुंडे हे निष्पाप आणि निरपराध आहेत असं सर्टिफिकेट दिलं. मी धनंजय मुंडेच्या मीडिया ट्रायलच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात साधूसंत राजकारणात आले तर त्यानिमित्ताने चांगले माणसं येतील आणि वाईट माणसं दूर होतील. नायतर कसा भस्मासुर परळीत झाला आणि त्याने कसा बीड जिल्हा खाल्ला हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. या भस्मासुराचा जन्मदाता कोण आणि त्याला या पापापासून सुटका आहे का? त्याला पोसलं आणि वाढवलं कोणी,त्याच्या तोंडाला रक्त कोणी लावल,हे आपत्य कोणाचं आहे, याची जबाबदारी कोण घेणार याची उत्तर महंत देणार आहेत का..? सत्तेच्या सिंहासनावर साधूत्व जरी आरूढ झालं तरी पिस गळतात ती साधूत्वाची.. आता त्यांनी राजकारणात पाऊल टाकलं आहे, लगेच पिस गळतील,” असे गंभीर सवाल मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उपस्थित केले आहे.