शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नामदेव महाराज शास्त्री यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : बीड हत्या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे नेते व मंत्री धनंजय मुंडे हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. मागील अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडसोबत संबंध असल्याचे आरोप करण्यात येत असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनी देखील धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी दिल्लीवारी देखील केली. यानंतर आता भगवानबाबगडाचे महंत हे धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. मात्र त्यांची भूमिका वादग्रस्त ठरली आहे.
यावरुन आता राज्याचे राजकारण रंगले आहे. भगवानबाबागडाचे महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे. मात्र त्याचबरोबर मयत संतोष देशमुख यांच्यावर आरोप केले. यामुळे अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. यामध्ये आता शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील भूमिका मांडली आहे. त्यांनी महंतांच्या भूमिकेवर आक्षेप घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, “नामदेव शास्त्री यांनी कुणाची पाठराखण करावी हे सांगण्यात इतपत मी मोठा नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. पण मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याविषयी त्यांनी जे विधान केलं, ते बोलणं योग्य नाही. त्या गादीची एक परंपरा आहे. या गादीचे जे मठाधिपती होते, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर समर्थक होते, याची त्यांनी सध्याच्या महंतांना आठवण करून दिली,” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अनेकांची थेट नावे घेऊन महंत डॉ.नामदेव महाराज शास्त्री यांना प्रश्न केला आहे. आव्हाड म्हणाले की, “संगीत दिघोळे, काकासाहेब गर्जे, महादेव मुंडे, बापू आंधळे, बंडू मुंडे यांचे खून झाले. तर महादेव गिते, सहदेव सातभाई, राजाभाऊ नेहरकर, बबन गिते, शिवराज बांगर यांच्यासह अनेकांवर जीवघेणे हल्ले झाले. यांना न्याय मिळणार आहे का? असा सवाल त्यांनी नामदेव शास्त्री यांना विचारला आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी खून केलेला नाही असे देखील ते पूर्ण खात्रीने म्हणाले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “मी शंभर टक्के सांगतो खून धनंजय मुंडे यांनी केलेला नाही. पण ते निर्दोष नाहीत या गँगला पोसण्याचं काम, राजकीय राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत न कळत केलं आहे, असा आरोप आव्हाडांनी केला. आदरणीय माणसांनी आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्यात. त्यांनी संतोष देशमुख यांच्या बद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. अजितदादा सांगतात की चुकला तर मोक्का लावीन पण त्यांनीच सांगितले की त्यांनी मोक्यातले आरोपी सोडलेत म्हणून. दादा एकमेव आहेत ज्यांनी सांगितलं की मी मोक्यातले आरोपी सोडवले. माझे फक्त विनंती असेल बाकी काहीही करा पण मोक्यातला आरोपी वाल्मीक कराडला सोडवायला जाऊ नका. धनंजय मुंडेंचं काही करू शकत नाही हे आम्हाला पण माहिती आहे,” असा खोचक टोला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे.