Photo Credit- Social Media ठाकरे बंधूंच्या युतीला पक्षांतर्गत नेत्यांचाच होतोय विरोध
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या शक्यतांच्या चर्चांना उधाण आले आहे. अनेक वर्षांपासून केवळ चर्चेपुरती मर्यादित असलेली ही शक्यता यावेळी मात्र प्रत्यक्षात उतरण्याची चिन्हं दिसत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरे यांच्या मनसेने आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (ठाकरे गट) पुन्हा हातमिळवणी केल्यास राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर आता महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह महायुती आणि महाविकास आघाडीनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी काही ठोस पावलंही उचलल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावेळी तरी हे दोघे बंधु एकत्र येणार का, मनसे-ठाकरे गटाची युती होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पण या युतीसाठी मात्र मनसे आणि ठाकरे गटातील नेत्यांकडूनच विरोधाचा सुरू उमटताना दिसत आहे.
गेल्या काही वर्षांत एकमेकांविरोधात टोकाच्या टीका आणि मतभेद असताना या युतीच्या चर्चांवरूनही दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध सुरु असल्याने वातावरण तापले आहे. विशेषतः, कधी काळी राज ठाकरे यांनी ‘माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय’ असं म्हणत शिवसेना सोडली होती. आज तेच ‘बडवे’ – म्हणजे पक्षातील वरिष्ठ सल्लागार आणि मध्यस्थ – या संभाव्य एकत्र येण्याच्या प्रयत्नांमध्ये अडथळा ठरत असल्याचं बोललं जात आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास राजकीय पटलावर मोठी हलचाल होऊ शकते, पण त्यांच्या सभोवतालच्या मंडळींनी हे समीकरण कसे हाताळले जाते, यावर या युतीचे भवितव्य अवलंबून असेल.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याची भूमिका मांडल्यानंतर काही क्षणातच उद्धव ठाकरे यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. पण त्याचवेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत युती तोडून त्यांना धोका दिला, आता ते पवारांनाही धोका देतील, असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मनसेने मशिदीवरील भोंग्यांविरोधात आंदोलन केले होते, त्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांवर 17 हजार गुन्हे दाखल केले होते. याची आठवण करून देत त्यांनी जुना वाद पुन्हा उकरून काढला.
दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत, “महाराष्ट्रद्रोही कोण हे जर राज ठाकरे यांना समजत नसेल, तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्गच सुरू करावा लागेल,” असा टोला लगावला. या आरोप-प्रत्यारोपांंमुळे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, दोन्ही पक्षातील ‘दुसरी फळी’च युतीच्या मार्गातील मुख्य अडथळा ठरू शकते, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.






